ते सर्व आरोप बिनबुडाचे..; धनंजय मुंडेंसाठी भाऊ मैदानात, सुरेश धसांवर केली जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:08 IST2025-03-11T16:07:58+5:302025-03-11T16:08:49+5:30
'आम्ही अजून किती दिवस गप्प बसायचे होते? धनंजय मुंडेंसारखे नेते तयार व्हायला 20 वर्षे लागली. त्यांची नाहक बदनामी केली जात आहे.'

ते सर्व आरोप बिनबुडाचे..; धनंजय मुंडेंसाठी भाऊ मैदानात, सुरेश धसांवर केली जोरदार टीका
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या क्रुर हत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराडची प्रमुख भुमिका असल्यामुळे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सातत्याने मुंडेंवर टीका करत आहेत. या प्रकरणामुळे मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. आता धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे (Ajay Munde) भावासाठी मैदानात उतरले असून, त्यांनी सुरेश धसांवर जोरदार टीका केली.
सुरेश धसांचे बिनबुडाचे आरोप
अलीकडेच आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंच्या कौटुंबिक बाबींवर टीका केली होती. त्यानंतर आता अजय मुंडेंनी आज पत्रकार परिषद घेऊन धसांचे सर्व आरोप फेटाळून लावले. 'सुरेश धसांनी एका वृत्त वहिनीवर मुलाखत दिली. त्यात धनंजय मुंडे साहेबांची आई त्यांच्यासोबत राहत नाही, असे चुकीचे वक्तव्य केले. सुरेश धस हे मुलाखतीत धनंजय मुंडेंच्या आईबद्दल बोलत आहेत. त्या परळीला आल्या नाही, त्यांचे चुलत भाऊ नाराज आहेत. कौटुंबिक कलह असल्याचा त्यांनी आरोप केला. पण आमच्या बाई परळीत राहत होत्या. मात्र त्या आता गावी राहत आहे. धनंजय मुंडेदेखील आईसोबतच राहतात. सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत,' अशी प्रतिक्रिया अजय मुंडेंनी दिली.
सुरेश धस धुतल्या तांदळाचे नाहीत...
अजय मुंडे पुढे म्हणतात, 'आम्ही अजून किती दिवस गप्प बसायचे होते? धनंजय मुंडेंसारखे नेते तयार व्हायला 20 वर्षे लागली. त्यांच्यावर आरोप नसताना नाहक बदनामी केली जात आहे. सध्या आमच्या परळीतील घराचे काम सुरू आहे, त्यामुळे मुंडे साहेब आणि बाई गावी राहत आहेत. आपल्या जन्मगावात जाऊन राहणे गुन्हा आहे का? सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत, हे माहीत आहे. त्यांना आरोप करायला काही शिल्लक नाही, म्हणून कौटुंबिक आरोप केले जात आहेत. आम्ही किती सहन करायचे?'
आरोप करून पळून जातात
'आज आमच्यावर कौटुंबिक आरोप केले जात आहेत, मात्र त्याला काहीही अर्थ नाही. आम्ही किती दिवस शांत बसायचे? कोणीतरी बोलले पाहिजे, म्हणून मी इथे बोलायला आलो आहे. आज कुटुंबावर आरोप केले, म्हणून मी पुढे येऊन बोलत आहे. आमचे शंभर-दिडशे टिप्पर आहेत, असा आरोप सुरेश धसांनी केला. पण, ते नेहमी आरोप करून पळून जातात, त्यांनी पुरावे सादर करावे. आज त्यांचा खोक्या बाहेर पडला, या खोक्याचा आका कोण आहे? ते स्वतःच म्हणतात की, हा त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यांचा कार्यकर्ता दोनशे हरणं मारुन खातो. यात सुरेश धसांना सहआरोपी करायला पाहिजे,' अशी मागणीही अजय मुंडेंनी केली.
संतोष देशमुखांना न्याय मिळावा
अजय मुंडे म्हणतात, 'संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची आधीपासून भूमिका आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीदेखील यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे आम्ही यावर जास्त भाष्य करणार नाही, न्यायालयाचा अवमान करणार नाही. पण, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, हीच आमची इच्छा आहे. मुंडे कुटुंब आरोपींच्या मागे आहे, असे समजू नये. जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. आमच्यावरील आरोप राजकारणाने प्रेरित आहेत. या घटनेचे कुणीही समर्थन करू शकत नाही. परळीची नाहक बदनामी केली जातीये,' असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले होते सुरेश धस?
सुरेश धसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, धनंजय मुंडे वाल्मीक कराडच्या संपूर्ण आहारी गेले आहेत. वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंना काही शिल्लक ठेवले नाही. धनंजय मुंडेंच्या घरातले या प्रकारामुळे थोड्याफार प्रमाणात नाराज आहेत. त्यांनी घरातल्या कोणाचेच काही चालू दिले नाही. धनंजय मुंडेंच्या आई दीड वर्षापासून नाथऱ्याला राहायला गेल्या आहेत, असा दावा धसांनी केला होता.