गेवराई : गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गुरुवारी रात्री नऊ वाजता वाळूमाफियांनी धुमाकूळ घालत महाराजांच्या गादीवर सिगारेट विझवली. त्याचबरोबर टाळ, मृदंग फेकून देत विणेकऱ्याला धक्काबुकी केल्याची घटना गेवराई तालुक्यातील नागझरी गावात घडली. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी गेवराई पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन देत वाळूमाफियांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
गेवराई तालुक्यातील मौजे नागझरी गावातील मारोती मंदिर परिसरात मागील सहा दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील वाळूमाफिया गणेश जऱ्हाड, नारायण भुसारे, बद्री काळे, बळीराम जऱ्हाड, प्रवीण ऊर्फ लल्या शिंदे, उमेश हरेर, कृष्णा जाधव यांसह इतरांनी सप्ताह सुरू असलेल्या ठिकाणी येऊन तेथील महाराजांच्या गादीवर सिगारेट विझवली. एवढेच नव्हे तर टाळ, मृदंग फेकून देत ‘तुम्ही हा सप्ताह बंद करा, नसता तुम्हाला जिवे मारून टाकू,’ अशा धमक्या दिल्या. विणेकऱ्यालाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी गेवराई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा प्रकार पाहून गावात सप्ताहाच्या निमित्ताने आलेले काही कीर्तनकार निघून जात असताना ग्रामस्थांनी त्यांना विनंती करत कीर्तनासाठी थांबवले. ही घटना कळताच रात्रीच्या वेळी गावातील लोक एकत्र आले. या प्रकारामुळे गावकरी रात्रभर जागे होते.
ग्रामस्थांची पोलिस ठाण्यात धावदरम्यान, नागझरी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेऊन वाळूमाफियांचा बंदोबस्त करून गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, गेवराई पोलिसांनी ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिले आहे.