धक्कादायक! बीडच्या कारागृहात सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याचा गांजा वाटपावरून राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:30 IST2025-08-12T12:29:03+5:302025-08-12T12:30:55+5:30
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! बीडच्या कारागृहात सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याचा गांजा वाटपावरून राडा
बीड : येथील जिल्हा कारागृहात गांजा तस्करीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहाच्या तटभिंतीवरून बाहेरून गांजा मागवून त्याच्या वाटण्यावरून चार कैद्यांमध्ये तुफान भांडण झाले. ही घटना निदर्शनास आल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत धमक्या दिल्या. या प्रकरणी चार न्यायाधीन बंदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याचाही समावेश आहे.
९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ४ मध्ये ठेवलेल्या चार कैद्यांमध्ये भांडणे सुरू झाल्याचे सुभेदार बलभीम किसनराव चिंचाणे यांना दिसून आले. त्यांनी तपासणी केली असता, न्यायाधीन बंदी श्याम उर्फ बाळू उत्तम पवार, वसीम खान अफजल खान पठाण, यमराज धरमसिंग राठोड आणि सतीश उर्फ खोक्या निराळ्या भोसले यांच्याकडे गांजासदृश अमली पदार्थ सापडला. या चारही कैद्यांनी संगनमत करून कारागृहाच्या तटभिंतीवरून बाहेरील व्यक्तीमार्फत हा गांजा मागवला होता. हा गांजा कागदात गुंडाळून पाण्याच्या बॉक्सखाली लपवून ठेवलेला होता. वाटण्यावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. अधिकाऱ्यांनी जाब विचारला असता, कैद्यांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि ‘बाहेर आल्यावर बघून घेतो’ अशी धमकी दिली.
या घटनेनंतर पोलिसांनी नायब तहसीलदारांसमक्ष पंचनामा करून ४६ ग्रॅम वजनाचा, ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी, चारही आरोपींवर गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांन्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.
चारही आरोपींना दुसरीकडे हलवणार
खोक्या भोसलेसह हे चारही आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. दरोडा, खुनासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्यांच्यात गांजा वाटपावरून वाद झाला. शिवाय अधिकाऱ्यांनाही धमकी दिली. यात गुन्हा दाखल झाला असला तरी या सर्वांना बीडमधून लातूर किंवा छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपास केला जाईल
या प्रकरणात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला असून ११ ऑगस्ट रोजी त्याची कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत. यात आता जबाब घेण्यासह इतर तपास केला जाईल.
- गजानन क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक बीड