सापडलेले दीड लाख रुपये दोन शिक्षकांनी केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST2021-07-26T04:30:45+5:302021-07-26T04:30:45+5:30

तालुक्यातील ढाकेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वसंत उद्धव तरकसबंद व त्यांचे मित्र संदेश अंबादास फावडे हे दोघे ...

The Rs 1.5 lakh found was returned by two teachers | सापडलेले दीड लाख रुपये दोन शिक्षकांनी केले परत

सापडलेले दीड लाख रुपये दोन शिक्षकांनी केले परत

तालुक्यातील ढाकेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वसंत उद्धव तरकसबंद व त्यांचे मित्र संदेश अंबादास फावडे हे दोघे चिंचपूरच्या मारुती मंदिर रस्त्यावर दररोज सायंकाळी फिरायला जातात. गुरुवारी त्यांना रस्त्यावर एक कापडी पिशवी निदर्शनास आली. उचलून घेतल्यानंतर पिशवीत दीड लाख रुपये असल्याचे दिसून आले. ही रक्कम असलेली पिशवी ज्याची हरवली आहे, तो लक्षात येताच शोध घेत या परिसरात येईल, असा विचार करून त्या दोघांनी हातात पिशवी घेऊन मारुतीचे दर्शन करू, असा विचार केला. दर्शन उरकून ते परत निघाले तरी कोणीच न आल्याने ही रक्कम नेमकी आता कोणाला द्यावी या विचाराने चालत असताना समोरून दुचाकीवरून कोरेगावचे तांदळे व टाकळीचे घुले आले. जवळ येताच त्यांनी या दोन्ही शिक्षकांकडे पिशवीबद्दल विचारपूस केली. त्यांच्या बोलण्यातून व शारीरिक हालचालीतून ती पिशवी त्यांचीच असल्याची खात्री झाल्यावर त्यांच्या स्वाधीन केली. ती रक्कम ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या ऊसतोड मजुराने मुकादमाकडून उचल घेतलेली असल्याचे सांगितले. हरवलेली रक्कम परत करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानताना त्या ऊसतोड मजुराचे डोळे भरून आले होते.

Web Title: The Rs 1.5 lakh found was returned by two teachers