Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; लोकायुक्तांकडून 'क्लीन चीट', अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:02 IST2026-03-04T15:58:32+5:302026-03-04T16:02:36+5:30
Dhananjay Munde Lokayukta: नॅनो खते ते स्प्रे पंप खरेदी; काय होतं 'ऑफिस ऑफ प्रॉफिट' प्रकरण? ज्यात मुंडेंना मिळाली क्लिन चीट

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; लोकायुक्तांकडून 'क्लीन चीट', अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळले
परळी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना राज्य लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी साहित्य खरेदी आणि ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ संदर्भात केलेले सर्व आरोप लोकायुक्तांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. उच्च न्यायालयानंतर आता लोकायुक्तांनीही क्लीन चीट दिल्याने मुंडे यांच्यावरील आरोपांची मालिका संपुष्टात आली आहे.
काय होते आरोप?
मुंडे कृषिमंत्री असताना नॅनो खते, कापूस बॅग आणि बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. शेकडो कोटींचा अपहार झाल्याचा दावा करत त्यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र, लोकायुक्तांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणतेही ठोस तथ्य किंवा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही या याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला होता.
'ऑफिस ऑफ प्रॉफिट'चा मुद्दा निकाली
दमानिया यांनी मुंडे यांच्यावर ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ (लाभदायक पद) संदर्भातही आरोप केले होते. सुनावणी दरम्यान मुंडे यांचे वकील शार्दुल सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले दिले. संविधानातील कलमे आणि लोकप्रतिनिधित्व कायद्याचा अभ्यास केल्यानंतर लोकायुक्तांनी हा आरोप देखील फेटाळून लावला.
न्यायालयीन लढाईत मुंडेंचे वर्चस्व
या निकालामुळे धनंजय मुंडे यांना मोठा राजकीय आधार मिळाला आहे. यापूर्वी पीकविमा संदर्भात कोणताही घोटाळा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते, तर निवडणूक शपथपत्रातील आरोपांतूनही मुंडे यांची सुटका झाली होती. आता लोकायुक्तांच्या निर्णयामुळे विरोधकांच्या आरोपांमधील हवा निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.