बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटीसह दलाल ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:34 IST2019-04-08T00:33:26+5:302019-04-08T00:34:10+5:30
जिजाईनगर भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांचा रविवारी दुपारी अचानक छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह एका दलालाही ताब्यात घेतले.

बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटीसह दलाल ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील जिजाईनगर भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांचा रविवारी दुपारी अचानक छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह एका दलालाही ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अश्विनी राजु सोळंके (२८ रा.बीड), दीपक ज्ञानोबा रत्नपारखी (२६ रा.बीड) अशी ताब्यात घेतलेल्या आंटी व दलालाचे नाव आहे. अश्विनीने बार्शी रोडवरील जिजाईनगर भागात जानेवारी महिन्यात एक घर किरायाने घेतले होते. पंधरा दिवस वातावरण पाहिल्यानंतर तिने दीपकच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू केला. दीपकने ग्राहक आणायचे आणि अश्विनीने महिलांची जुळवाजुळव करायची, असा काहीसा प्रकार त्यांचा सुरू होता.
ही माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि. शिवलाल पुर्भे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथकामार्फत सापळा लावत दुपारी अडीच वाजता छापा टाकला. यामध्ये दीपक व अश्विनीला ताब्यात घेतले. बीडमधीलच २ महिलांची यातून सुटका केली. त्यांच्यावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे पुर्भे यांनी सांगितले. पुर्भे यांच्यासह पोह खेडकर, प्रधान, आनवणे, सय्यद, सपकाळ यांचा कारवाईत समावेश होता.
८०० रुपयांत झाला सौदा
.पोलिसांनी ८०० रुपये घेऊन आपल्या डमी ग्राहकाला पाठविले. दलाल व आंटीच्या हातात पैसे सोपविल्यानंतर येथे कुंटणखाना चालत असल्याची माहिती ग्राहकाने ती पोलिसांनी दिली. त्यानंतर अचानक छापा टाकण्यात आला.