बीडमध्ये सरपंचाची हत्या होण्यापूर्वी ही कसली मीटिंग?; PSI आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 17:32 IST2024-12-17T17:29:43+5:302024-12-17T17:32:35+5:30
जिल्ह्यात पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

बीडमध्ये सरपंचाची हत्या होण्यापूर्वी ही कसली मीटिंग?; PSI आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडीओ समोर
Beed Murder Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आठवडा उलटून गेल्यानंतरही गुन्ह्यातील सातपैकी फक्त तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर चार आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात असतानाच एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. केजचा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे दोघे हत्येची घटना होण्यापूर्वी केज शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे.
संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर कारवाईस टाळाटाळ केल्याप्रकरणी याआधीच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील याला निलंबित करण्यात आलं आहे. अशातच पाटील हा हत्येची घटना होण्यापूर्वी आरोपी सुदर्शन घुले याला का भेटला होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि नराधम आरोपी यांच्या संगनमतानेच या हत्येचा कट रचला गेला का, असाही सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरण, पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले भेटल्याचा व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/SL7UZnLqrC
— Lokmat (@lokmat) December 17, 2024
पोलीस निरीक्षकावरही झाली आहे कारवाई
नागरिकांतील वाढता रोष पाहून आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना हत्या प्रकरणानंतर सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यानंतर केज पोलीस ठाण्याची जबाबदारी जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आली.
हत्येला पोलीसही जबाबदार?
बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी दुपारी ३ वाजता संतोष देशमुख यांचं घुले आणि इतर नराधमांनी अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांचे आत्येभाऊ याबाबतची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांनी तब्बल ३ तास अपहरणाची फिर्यादच नोंदवून घेतली नाही. शिवाय देशमुख यांच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. पोलिसांनी तात्काळ शोधाशोध केली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता," असा आरोप आमदार धस यांनी केला आहे.
आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय यंत्रणा कार्यरत?
मस्साजोग गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची सोमवारी दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर हा वाद झाला त्या कंपनीला २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्किम कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे याची वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेली जवळीक बीड जिल्ह्यात चर्चिली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातपैकी फरार असलेल्या इतर चार आरोपींना वाचवण्यासाठी पडद्याआडून कोणती राजकीय यंत्रणा कार्यरत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.