कैद्यांची दाढी कापली, कीर्तन बंद केले!; बीड जेलरवर धर्मांतरासाठी मारहाणीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:28 IST2025-10-13T18:27:43+5:302025-10-13T18:28:37+5:30
जामिनावर आलेल्या व्यक्तीचा जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप

कैद्यांची दाढी कापली, कीर्तन बंद केले!; बीड जेलरवर धर्मांतरासाठी मारहाणीचा गंभीर आरोप
बीड : हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्यासाठी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी आम्हाला जेवण दिले नाही आणि मारहाण केली. तसेच काही मुस्लीम कैद्यांची दाढी कापली, नमाज बंद केली. याचबरोबर हिंदूंचे कीर्तन, आरतीही बंद केल्याचा गंभीर आरोप खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या एका व्यक्तीने शनिवारी केला. यामुळे पुन्हा एकदा धर्मांतराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सर्वांची तक्रार वकिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कल्याण वासुदेव भावले (रा. पांढरवाडी, ता. गेवराई) हे खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात होते. शुक्रवारी त्यांची जामीन झाली. शनिवारी दुपारी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत गायकवाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. भावले म्हणाले, "मी साधारण एक वर्षापासून बीडच्या कारागृहात आहे. आतापर्यंत सर्व सुरळीत होते, परंतु जसे पेट्रस गायकवाड आले, तेव्हापासून सर्व परिस्थिती बिघडली आहे. त्यांनी कारागृहातील भजन, आरती आणि पवित्र नमाज बंद केला. त्यानंतर महापुरुष, संतांचे फोटो काढले. धर्मांतर करण्यासाठी आमच्यावर दबाव आणला. जेवण दिले नाही, मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर गुन्ह्यातून सोडवू, पैसे देण्याचे आमिषही त्यांनी दाखवले." यासंदर्भात आपण लेखी तक्रार केली होती, परंतु गायकवाड यांनी ती पुढे पाठवली नाही, असा आरोपही भावले यांनी केला. माझ्या भावानेही यासंदर्भात तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मांतर न केल्याने पतीचा खून
'माझा आंतरजातीय विवाह आहे. माझ्या पतीवर ख्रिश्चन धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. त्यांना बेदम मारहाण केली. शरीरावर २२ ठिकाणी गंभीर जखमा होत्या. धर्मांतर न केल्याने माझे पती चिन्या जगताप यांचा खून केल्याचा आरोप मीनाबाई जगताप यांनी गायकवाड यांच्यावर केला. आता प्रकरण मिटवून घेण्यासाठी पोलिस आणि इतर लोकांमार्फत दबाव आणला जातो. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. न्यायालयात तारखेला आल्यावर गुंड घेऊन येतात. तसेच मला ४० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवल्याचेही मीनाबाई यांनी सांगितले. जळगावमध्ये असताना माझ्या पतीचा खून केला. आता बीडमध्येही असेच प्रकार घडत असल्याचे समजल्याने आपण येऊन यासंदर्भात बोलल्याचे त्यांनी सांगितले.
कारवाईसाठी सात दिवसांचा वेळ
धर्मांतर प्रकरणाची मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, महानिरीक्षक आदींकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. यात गायकवाड यांच्यावर कारवाईसाठी सात दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतर आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी दिली.