धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव? चौकशी अहवालानंतर बीडच्या जेलरची नागरपूर कारागृहात बदली!
By सोमनाथ खताळ | Updated: October 15, 2025 15:12 IST2025-10-15T15:10:03+5:302025-10-15T15:12:44+5:30
भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यांनी जेलरवर हे गंभीर आरोप केले होते.

धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव? चौकशी अहवालानंतर बीडच्या जेलरची नागरपूर कारागृहात बदली!
बीड : येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर नागपूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर त्यांच्यावर आरोप होता. यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यांनी गायकवाड यांच्यावर हे गंभीर आरोप केले होते. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, नकार देणाऱ्या कैद्यांचा छळ करणे, भजन-आरती बंद करणे आणि महापुरुषांचे फोटो हटवून बायबलमधील श्लोक लावणे अशा तक्रारी होत्या. यापूर्वी गायकवाड यांच्यावर विनापरवाना वृक्षतोड आणि कैद्यांकडून खासगी वाहन धुवून घेतल्याचेही आरोप होते. या सर्व गंभीर आरोपांची पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षता पथकांनी कसून चौकशी केली. चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलत गायकवाड यांची बीडमधून नागपूर येथील कारागृहात बदली केली आहे. या बदलीमुळे बीडच्या कारागृह प्रशासनातील वादावर सध्या तरी पडदा पडला आहे.
बदली नव्हे थेट निलंबन करा
कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर जळगावमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर याच गायकवाड यांच्या काळात बीडमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला. याचे फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामुळे गायकवाड यांची केवळ बदलीच नव्हे तर त्यांना निलंबीत करावे, अशी मागणीही काही लोकांनी केली.