Prakash Solanke:राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी मंत्रिपद न मिळाल्याने पुन्हा एकदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोळंके पाच टर्मपासून आमदार आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना सातत्याने डावलले जात आहे. त्यांच्या मागून आलेले धनंजय मुंडे मंत्री झाले, मात्र सोळंके यांच्या गळ्यात काही वर्षांपासून मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. आता त्यांनी मराठा समाजाचा असल्यामुळे मंत्रिपद मिळत नसल्याची भावना व्यक्त केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाचा वापर केल्याचा आरोपही केला.
अजित पवारांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केले होते. त्यांच्यावरील आरोप बाजूला झाले की त्यांना संधी देऊ, असे पवार म्हणाले. यावर बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एका स्थानिक वृत्त वाहिनीशी संवाद साधताना प्रकाश सोळंके म्हणाले, "मला मंत्रीपद मिळत नाही, कारण माझी जात आडवी येते. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्याचे दिसते आहे. इथे बहुजन समाजाला स्थान द्यायचे नाही, अशी पक्षाची भूमिका असावी.' प'क्षाचा इतिहास मला माहिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा राहिला आहे. गेल्या अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील. केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला. मात्र, मंत्रिपद देताना शरद पवारांपासून ते आता अजित पवारांपर्यंत...प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितले नाही. ही वस्तूस्थिती आहे. मी पाच टर्म आमदार राहिलो आहो, 35 वर्षांपासून राजकारण अनुभवतोय, त्या अनुभवातूनच बोलतोय. कदाचित पक्षाच्या दृष्टीने बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असावा, असे मला वाटते,' अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले.
तसेच, यावेळी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या संकेतांबाबत सोळंके म्हणाले, 'अजित पवारांनी काय संकेत दिले आहेत, हे मला माहिती नाही. धनंजय मुंडे आमच्याच पक्षाचे आमदार आहेत, माझ्या शेजारीच त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. धनंजय मुंडेंना क्लिनचीट मिळाली, त्याबाबतीत माझे जे काही मत आहे, ते मी पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे,' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या सर्व विधानांवरुन सोळंके पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. यावर अद्याप पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.