धनंजय मुंडे- सुरेश धस यांच्यात रंगल्या 'कानगोष्टी' ! दोघांना पाहून पंकजा मुंडेंचीही कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:50 IST2026-04-10T15:27:59+5:302026-04-10T15:50:37+5:30
मुंडे बहीण-भावासोबत सुरेश धस एकाच व्यासपीठावर; म्हसोबाची वाडी येथील ९४व्या नारळी सप्ताहात रंगली ‘राजकीय’ जुगलबंदी;

धनंजय मुंडे- सुरेश धस यांच्यात रंगल्या 'कानगोष्टी' ! दोघांना पाहून पंकजा मुंडेंचीही कोपरखळी
बीड / कडा : कृषी घोटाळा आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून टोकाची टीका करणारे आमदार सुरेश धस आणि आमदार धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर 'कानगोष्टी' करताना दिसून आले. आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे आयोजित ९४व्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभात या दोन कट्टर राजकीय विरोधकांमधील जवळीक आणि रंगलेल्या 'कानगोष्टी' जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस शेजारीच बसले होते. राजकीय मैदानावर एकमेकांचे वाभाडे काढणारे हे दोन्ही नेते चक्क एकमेकांच्या कानात कुजबुजताना दिसले. त्यांच्यातील हा संवाद पाहून "नेमकं काय बोलणं झालं असेल?" असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे बहीण-भावावर गंभीर आरोप करणाऱ्या आमदार धस यांनी यावेळी पंकजा मुंडेंचा उल्लेख ‘पंकजाताई’, तर धनंजय मुंडेंचा उल्लेख 'धनंजयजी' असा सन्मानाने केला.
या धार्मिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आ. भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर आणि प्रताप ढाकणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तीव्र राजकीय संघर्षानंतर धार्मिक कार्यक्रमाचा मुहूर्त साधून मुंडे बहीण-भाऊ आणि आमदार सुरेश धस एकत्र आल्याने राजकीय हवा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंकजा मुंडेंची कोपरखळी
व्यासपीठावरील हे दृश्य पाहून पंकजा मुंडे यांनीही आपल्या भाषणात चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. "माझे बंधू धनंजय मुंडे, त्यांच्याच बाजूला बसून कानात बोलणारे आमदार सुरेश धस आणि या दोघांच्या गप्पा ऐकणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर..." असे म्हणत त्यांनी या त्रिकुटाच्या भेटीवर कोपरखळी मारली.
जयदत्त क्षीरसागरांची फडणवीसांशी जवळीक, पण..
बीड नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पडद्यामागून रसद पुरवूनही व्यासपीठावर जाण्याचे टाळणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या धार्मिक सोहळ्यात मात्र मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठ शेअर केले. तेव्हा केवळ हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन काढता पाय घेणाऱ्या क्षीरसागरांची आता मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, एकीकडे मुख्यमंत्र्यांशी सलोखा वाढवत असतानाच दुसरीकडे बीड जिल्ह्यातील भाजप नेत्यांपासून त्यांनी राखलेले ‘ठराविक अंतर’ राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना खतपाणी घालत आहे. या नव्या समीकरणांचे नेमके 'पॉलिटिकल आउटपूट' काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकाच हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री अन् मुंडे बहीण-भाऊ !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांची हेलिकॉप्टरमधून एकत्रित 'एन्ट्री' झाली. व्यासपीठावर धनंजय मुंडेंचे नाव घेताच भाविकांनी 'डी.एम.'च्या घोषणा दिल्या. एका कार्यकर्त्याने तर फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याची मागणी केली. परंतु त्यांनी काही न बोलताच आभार मानून भाषणाचा समारोप केला.