गुंडांसोबत पोलिसांची ऊठबस, आरोपींना अभय मिळाल्यानेच सरपंचांची हत्या: धनंजय देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 19:39 IST2025-02-10T19:39:10+5:302025-02-10T19:39:32+5:30
भावाच्या हत्येला दोन महिने झाले; परंतु एक क्षणही आठवणीशिवाय जात नाही. थोडेही दु:ख कमी होत नाही. या वेदना भयानक असून, यातून कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही बाहेर आलेले नाहीत

गुंडांसोबत पोलिसांची ऊठबस, आरोपींना अभय मिळाल्यानेच सरपंचांची हत्या: धनंजय देशमुख
बीड : गुंडांसोबत पोलिस अधिकाऱ्यांची ऊठबस होती. त्यांनीच अभय दिले. त्यामुळेच हत्येची घटना घडल्याचा गंभीर आरोप मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला, तसेच सर्वांत मोठे पाप हे केज पोलिसांनी केल्याचेही ते म्हणाले. यामुळे बीड पोलिस पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
भावाच्या हत्येला दोन महिने झाले; परंतु एक क्षणही आठवणीशिवाय जात नाही. थोडेही दु:ख कमी होत नाही. या वेदना भयानक असून, यातून कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही बाहेर आलेले नाहीत, तसेच या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिस अधिकाऱ्यांसोबत मांडीला मांडी लावून बसत होता. एका कार्यालयात त्यांचे चहापाणी होत असे. त्याला अभय दिले. त्याच्यावर वेळीच कारवाई केली असती तर अशा घटना टळल्या असत्या, तसेच घटनेनंतर रात्री साडेदहा वाजेपर्यंत आरोपींचे मोबाइल सुरू होते. त्यांचा मोबाइल कोणीही ट्रेस केला नाही. त्यांचा पाठलाग केला त्या वाहनातही एक चालक आणि एकच कर्मचारी होता. हा बालिशपणा आहे. आता आरोपी फरार का आहे, तर हे प्रशासनानेच सांगावे, असेही धनंजय देशमुख म्हणाले.
कारवाई न करता सोडले
पहिल्या घटनेत पोलिसांनी आरोपींना रात्री ११ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर त्याला टेबल जामीन देण्यात आला. त्यांच्यावर कोणतीही मोठी कारवाई न करता सोडले. त्यामुळे सर्वांत माेठे पाप हे केज पोलिसांनी केल्याची टीकाही धनंजय देशमुख यांनी केली.
महादेव मुंडेंच्या पत्नीही आक्रमक
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास १४ महिने उलटूनही लागलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याचा तपास परळी पोलिसांकडून काढून घेत अंबाजोगाईचे उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे दिला; परंतु १२ दिवस उलटूनही त्यांनी तपासात काहीच केले नसल्याचा आरोप महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी केला आहे, तसेच चोरमले हे घरी येऊन भेटतो म्हणाले होते; परंतु तपासाच्या अनुषंगाने त्यांनी काहीच केले नाही. आता मी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. त्या आधी मंगळवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे. आम्ही मध्यमवर्गीय असल्याने आम्हाला न्याय दिला जात नाही का? आता आमच्या प्रकरणातही एसआयटी आणि सीआयडी नेमावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. यावेळी पत्नीसह दोन्ही मुलांना अश्रू अनावर झाले होते.