खासगी चारचाकीवर दुचाकीचा क्रमांक, त्यावर 'दिवा' लावून बीडमध्ये पोलिस अधिकाऱ्याचा रुबाब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:26 IST2025-12-11T18:23:44+5:302025-12-11T18:26:41+5:30
बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचा प्रताप; एसपी कार्यालयातूनच होतोय नियमित प्रवास

खासगी चारचाकीवर दुचाकीचा क्रमांक, त्यावर 'दिवा' लावून बीडमध्ये पोलिस अधिकाऱ्याचा रुबाब!
बीड : लाचखोरी आणि खंडणीच्या आरोपांमुळे आधीच मलीन झालेल्या बीड पोलिस दलाची प्रतिमा आता आणखी एका गैरप्रकारामुळे चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्या खासगी चारचाकी वाहनाला दुचाकीचा क्रमांक लावून त्यावर दिवा लावून चक्क रुबाब गाजविणे सुरू केले आहे.
बीड पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी सतत कोणत्या ना कोणत्या गैरकारणाने चर्चेत असतात. वाळू माफियांकडून लाच घेणे, सराफा व्यापाऱ्याकडून खंडणी मागण्याचा आरोप आणि अत्याचार पीडितेच्या आईला पोलिस ठाण्यातून गावगुंडांनी घेऊन जाणे, ही ताजी प्रकरणे असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित अधिकाऱ्याने खासगी वाहनावरच दिवा लावून फोटोसेशन केले. एवढेच नव्हे, तर याच चारचाकी वाहनाला लावलेला क्रमांक तपासणीअंती दुचाकीचा असल्याचे समोर आले आहे. ज्या दुचाकीचा क्रमांक वापरला आहे, तिचा मूळ मालक सिंदखेड राजा येथील रहिवासी असून, त्या दुचाकीवर ५०० रुपयांचा दंडही बाकी आहे. याच दुचाकीचा क्रमांक लावून सदर अधिकारी सर्रास प्रवास करत असून, विशेष म्हणजे त्यांचा रोजचा प्रवास पोलिस अधीक्षक कार्यालयातूनच होतो, असे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडूनच अशा प्रकारे फसवणूक आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे अधिकारी कोण, याची चर्चा सध्या बीड पोलिस दलात जोरात सुरू आहे.
चुकीच्या क्रमांकासह 'काळ्या काचा'
वाहतूक पोलिस आणि आरटीओ सामान्य नागरिकांवर काळ्या काचांसाठी दंड आकारतात, पण बीडमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या खासगी चारचाकीवर चुकीचा क्रमांक आणि काळ्या काचा लावून सर्रास प्रवास सुरू आहे. विशेष म्हणजे हे वाहन थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून उभे केले जात आहे. इतके दिवस या चुकीच्या क्रमांकाकडे कोणीच बोट ठेवले नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या बेफिकीरपणामुळे कायद्याचे रक्षकच नियम तोडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काचेवर 'महाकाल' नाव, वर पिवळा दिवा
याच चारचाकी वाहनाच्या समोरील काचेवर 'महाकाल' असे नाव लिहिलेले आहे, तर वर पिवळा दिवा लावलेला आहे. शासकीय वाहनांवर 'पोलिस' किंवा 'महाराष्ट्र शासन' असे लिहिलेले असते; परंतु दिवा लावलेल्या या खासगी चारचाकी वाहनावर 'महाकाल' हे नाव असल्याने हा प्रकार संशयास्पद वाटला. याची खोलवर चौकशी केली असता हे सर्व बनावट असल्याचे उघड झाले आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट स्वाक्षरी करून १ कोटीची कामे घेण्याचा प्रयत्न करणे आणि जिल्हाधिकारी यांची बनावट स्वाक्षरी करून ७३ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. आता पोलिस अधिकाऱ्यानेच असा बनावट प्रकार केल्याचे उघड झाल्याने बीड पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षकांकडून कारवाईचे संकेत
या गैरप्रकारावर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, खासगी वाहनांवर दिवा लावता येत नाही तसेच चुकीचा नंबर लावला असेल, तर ते खूप गंभीर आहे. त्यातही जर आमच्या अधिकाऱ्यांनीच असे केले असेल, तर हे खूपच चुकीचे आहे. मोटार वाहन कायदा आणि इतर कलमान्वये कारवाई केली जाईल, असे म्हणत त्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.