वृद्धाची हरवलेली पिशवी पोलिसांनी ४ तासात शोधली; त्यातून निघालेली रक्कम पाहून सारेच झाले अवाक्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:04 IST2021-05-25T18:01:47+5:302021-05-25T18:04:03+5:30
कोरोना पार्श्वभूमीवर परळी चे प्रभू श्री वैद्यनाथाचे मंदिर लॉकडाऊनमुळे काही महिन्यापासून बंद आहे.परंतु, मंदिराच्या पायऱ्यावर काही निराधार बसलेले असतात.

वृद्धाची हरवलेली पिशवी पोलिसांनी ४ तासात शोधली; त्यातून निघालेली रक्कम पाहून सारेच झाले अवाक्
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथ मंदिर परिसरातील एका ८० वर्षाच्या वृद्धाजवळील एक पिशवी अचानक गायब झाल्याच्या प्रकार मंगळवारी सकाळी घडला. पोलिसांनी वृद्धाच्या तक्रारीवरून तपास करत रामनगर तांडा परिसरातून चोरीस गेलेली पिशवी शोधून काढली. यावेळी पोलिसांनी पिशवीतील रक्कम मोजली असता त्यात १ लाख ७२ हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्याने सारेच अवाक झाले.
याबाबतची माहिती अशी की, कोरोना पार्श्वभूमीवर परळी चे प्रभू श्री वैद्यनाथाचे मंदिर लॉकडाऊनमुळे काही महिन्यापासून बंद आहे..परंतु मंदिराच्या पायऱ्यावर काही निराधार बसलेले असतात. त्यांना जवळच मोफत शीवभोजन दिले जाते. तसेच शहरातील काही दानशूर लोक मंदिर परिसरातील निराधारांना नाष्टा,जेवण, फळ, चहापाणी यासोबत रोख स्वरुपात दान देतात. येथेच गेल्या काही वर्षांपासून बाबुराव नाईकवाडे हे ८० वर्षीय वृद्ध थांबतात. दानशुरांनी दिलेली रक्कम ते एका पिशवीत ठेवतात. रक्कम ठेवलेली पिशवी ते कधीच आपल्यापासून दूर करत नाहीत. मंदिर परिसराच्या जवळील रामनगर तांडा येथे एका खोलीत ते राहतात. त्यांना दोन मुले, सूना, एक मुलगी असा परिवार आहे. मुले हे वीटभट्टीवर कामास आहेत. मंगळवारी सकाळी रोख रक्कम ठेवलेली पिशवी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जवळची सगळी जमा पुंजी गायब झाल्याने त्यांनी रडतच पोलीस ठाणे गाठले. नाईकवाडे रडत असल्याचे पाहून शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने या चोरीचा छडा लावायचा असा निर्धार केला. नाईकवाडे यांना सोबत घेत ते कुठे बसत होते, कुठे झोपत होते, कुठे राहत होते याची पाहणी केली.
रामनगर तांडा येथे जाऊन पोलिसांनी पाहणी केली. पोलिसांचे पथक परिसरात आल्याचे पाहुन तेथील नागरिक चक्रावून गेले. चोरीचा पोलिसांनी शोध घेतला असता तेथून काही किलोमीटर अंतरावर एक पिशवी आढळून आली. ही पिशवी पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणली. त्यातील विस्कटलेल्या नोटा व्यवस्थित करून त्याचे बंडल बांधले. नोटा लावण्यास व मोजण्यास पोलिसांना एक तास लागला...तेव्हा पिशवीत १ लाख ७२ हजार रुपये असल्याचे आढळून आले. त्यामध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटा होत्या. ही सर्व रक्कम सहायक पोलीस निरीक्षक पालवे यांच्या हस्ते नाईकवाडे यांना सुपूर्द करण्यात आली. परळी शहरचे सहायक पोलीस निरीक्षक जे.बी. पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलिस जमादार भास्कर केंद्रे, शंकर बुट्टे ,गोविंद भताने यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका वृद्धाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य तराळले.