पवारांनी पंडितांच्या घरात घुसून मारहाण केली; मग पंडित बाप-लेकही पवारांच्या दिशेने धावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:25 IST2025-12-05T17:21:01+5:302025-12-05T17:25:01+5:30
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल : गेवराईतील घटनेत पंडितांच्या पीएचा जबाब नोंदविला

पवारांनी पंडितांच्या घरात घुसून मारहाण केली; मग पंडित बाप-लेकही पवारांच्या दिशेने धावले
बीड : गेवराई नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पवार आणि पंडित कुटुंबातील संघर्ष विकोपाला गेला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. फुटेजमध्ये पवार गटातील काही लोकांनी थेट पंडित कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण केल्याचे दिसत आहे. या हिंसक घटनेनंतर पंडित कुटुंबातील वडील आणि मुलांनीही संतप्त होऊन थेट पवार गटाच्या घराच्या दिशेने धाव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पंडितांच्या स्वीय सहायकाचा जबाब पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा नोंदवला आहे.
गेवराईत मतदानाच्या दिवशी २ ङिसेंबर रोजी पंडित आणि पवार गटात राडा झाला होता. यात एकमेकांच्या घरावर धावून जात वाहनांची तोडफोड झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत भाजपचे बाळराजे पवार, शिवराज पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जयसिंग पंडित, पृथ्वीराज पंडित यांच्यासह ४० ते ५० जणांवर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु यातील एकही आरोपी अटक केला नाही. मुख्य आरोपींना नोटीसवर सोडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
सीसीटीव्हीत काय काय दिसले?
सकाळी १०:१८ वाजता एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. तिने काळ्या स्कॉर्पिओला धडक दिली. त्यानंतर पांढऱ्या गाडीतून ५ ते ८ जण उतरले आणि माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या घरात घुसले. राडा केल्यानंतर १०:१९ वाजता आतून सर्वजण पळत आले आणि पुन्हा त्याच पांढऱ्या गाडीत बसून निघून गेले. १०:२४ वाजता पंडित समर्थकांच्या दोन काळ्या स्कॉर्पिओ गाड्या घराजवळ आल्या. १०:२५ वाजता पंडितांच्या घरातून एक जमाव पवारांच्या घराकडे गेल्याचे दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओत जयसिंग पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. हे दोघेही नात्याने सख्खे मेहुणे आहेत.
पंडित बंधूंनी घेतली एसपींची भेट
आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गुरुवारी दुपारी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. त्यांनी घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.
आगोदरच एक गुन्हा दाखल असल्याने स्वतंत्र गुन्हा दाखल करणार नाही. जखमीचे प्रमाणपत्र पाहून नंतर कलमांची वाढ केली जाईल. अमृत डावकर यांचा जबाब घेतला आहे. समोरचेही जबाब देणार आहेत, असे समजले. यातील प्रमुख आरोपींना नोटीसवर सोडले आहे. अद्याप कोणालाही अटक नाही.
- किशोर पवार, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर बीड