परळीतील कुख्यात दारुमाफिया स्थानबध्द; हर्सूल कारागृहात रवानगी
By संजय तिपाले | Updated: October 15, 2022 13:17 IST2022-10-15T13:16:58+5:302022-10-15T13:17:57+5:30
शेख मंजूर शेख खाजामिया (५२,रा.गणेशपार , परळी) असे आरोपीचे नाव आहे.

परळीतील कुख्यात दारुमाफिया स्थानबध्द; हर्सूल कारागृहात रवानगी
बीड: हातभट्टी दारु तयार करुन विक्री करणाऱ्रूा परळीतील कुख्यात माफियाला एमपीडीएनुसार (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) स्थानबध्द करण्यात आले. त्याची रवानगी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली.. १५ ऑक्टोबरला स्थानिक गुन्हे शाखा व परळी शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
शेख मंजूर शेख खाजामिया (५२,रा.गणेशपार , परळी) असे आरोपीचे नाव आहे. शहर ठाण्यात त्याच्यावर हातभट्टी दारु बनविणे, विक्री करणे या स्वरुपाचे अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे न्यायप्रविष्ठ तर एक तपासावर आहे. त्याच्याविरुध्द एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी पाठवला. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हधिकाऱ्यांना सादर केला. त्यांनी १४ ऑक्टोबरला आदेश जारी केला. त्यानुसार, १५ ऑक्टोबरला सकाळीच परळी शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने शेख मंजूर शेख खाजामिया याच्या मुसक्या आवळल्या. त्याची रवानगी बंदोबस्तात औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, अंबाजोगाईचे प्रभारी उपअधीक्षक स्वप्नील राठाेड, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.सतीश वाघ, परळी शहर ठाण्याचे पो.नि.उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चंद्रकांत गोसावी, हवालदार अभिमन्यू औताडे, पो.ना.किशोर घटमळ, विष्णू फड यांनी कारवाई केली.
प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही हातभट्टीचा धंदा जोमात
हातभट्टी दारुचा व्यापार करत असलेल्या शेख मंजूरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ९३ नुसार प्रतिबंधात्म कारवाई केली होती. मात्र, याउपरही त्याचा हातभट्टीचा धंदा जोमात सुरु होता.