सलग दुसऱ्या दिवशी परळी बंद; वाल्मीक कराडच्या गावात समर्थकांचे मोबाईल टॉवरवर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:06 IST2025-01-15T12:05:13+5:302025-01-15T12:06:14+5:30
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आल्यानंतर परळी शहरात तीव्र पडसाद उमटले.

सलग दुसऱ्या दिवशी परळी बंद; वाल्मीक कराडच्या गावात समर्थकांचे मोबाईल टॉवरवर आंदोलन
परळी (बीड) : सलग दुसऱ्या दिवशीही परळी येथील बाजारपेठ बंद आहे. वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर मंगळवारी तीन वाजता काही कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार परळीची बाजारपेठ दुपारपासून बंद होती. आज बुधवारी, दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपले दुकाने उघडलेली नव्हती. शहरातील आडत बाजारपेठ ,किराणा लाईन मेन रोड, राणी लक्ष्मीबाई टावर ,नेहरू चौक, स्टेशन रोड व अन्य ठिकाणची दुकाने बंद असल्याचे दिसून आली. काही ठिकाणचे औषध दुकाने चालू होती. शहरातील हॉटेल्स ही बंद आहेत.
दरम्यान, वाल्मीक कराड यांच्या पांगरी गावात बुधवारी सकाळी पांगरी कॅम्प येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून गावातील 5 समर्थक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. वाल्मीक कराड यांना न्याय द्यावा व त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी ग्रामस्थ ही रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी आमदार सुरेश धस व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे.
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आल्यानंतर परळी शहरात तीव्र पडसाद उमटले. परळीतील चार जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला तर दोन ठिकाणी टायर जाळून सरकारच्या कारवाईचा निषेध नोंदविला आहे. बुधवारी सकाळी पांगरी जवळील पांगरी कॅम्प येथे असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या टॉवरवर पांगरी गावातील मारुती आश्रुबा मुंडे, संदिपान कुटेवाड, मोहन पाचंगे, राजाभाऊ मुंडे, मुंजाजी काटोळे हे कार्यकर्ते चढले. वाल्मीक कराडला न्याय द्या, अशा घोषणा सुरू केल्या. तसेच पांगरी व पांगरी कॅम्प येथील ग्रामस्थ ही रस्त्यावर आले असून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे.
आम्ही स्वयंस्फूर्तीने बंद पाळल्याचा दावा
परळी येथील व्यापारी बुधवारी सकाळी एकत्र आले. यावेळी एक व्यापारी म्हणाला, आमदार सुरेश धस यांनी परळी शहराची विनाकारण बदनामी केली आहे. आम्ही आज आणि काल स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे.