जिल्हा रुग्णालय : समन्वय, संवाद नसल्याने नियोजन बिघडले
बीड : दिव्यांग व्यक्ती तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यासाठी पहाटेपासूनच जिल्हा रुग्णालयात आले होते. परंतु, डॉक्टर हजर नसल्याने त्यांना दुपारपर्यंत उपाशीपाेटी ताटकळावे लागले. अधिकाऱ्यांचा समन्वय आणि योग्य संवाद नसल्याने नियोजन बिघडत आहे. त्यामुळे दिव्यांगांची फरफट होत असल्याचे दिसत आहे.
जिल्हा रुग्णालयातील दिव्यांगांची तपासणी कोरोनामुळे बंद होती. मागील दोन महिन्यांपासून कशातरी या तपासण्या सुरू झाल्या आहेत. प्रत्येक बुधवारी दिव्यांग बोर्ड असतो. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग व्यक्ती रुग्णालयात येतात. परंतु, येथे आल्यावर त्यांना कसलीच सुविधा, सोय अथवा उपचार मिळत नसल्याचे दिसते. पहाटे आलेल्या रुग्णांना दुपारी तीननंतर तपासले जात आहे. तोपर्यंत सर्वच डॉक्टर गायब राहत असल्याचे दिसते. बुधवारीही अशीच परिस्थिती दिसली. डॉक्टर नसल्याने दिव्यांग व्यक्ती जमिनीवरच बसल्या होत्या. पहाटेच आलेले असल्याने अनेकांनी जेवणही केलेले नव्हते. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
---
मागच्या वेळेसच सर्वांना उपस्थित राहण्यास सांगितलेले आहे. आतासुद्धा मी भेट दिली आहे. सर्वांना हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दिव्यांगांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.-
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
110821\184311_2_bed_15_11082021_14.jpeg
डॉक्टर नसल्याने दिव्यांग अशाप्रकारे जमिनीवर बसले होते.