महादेव मुंडे खून प्रकरणावरून दोन्ही 'राष्ट्रवादी' भिडल्या; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, समर्थकांचा पलटवार;
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:38 IST2026-03-06T12:29:28+5:302026-03-06T12:38:32+5:30
परळीत महादेव मुंडे खून प्रकरणावरून दोन्ही राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप; राजेभाऊ फडांचे धनंजय मुंडेंवर आरोप, तर मुंडे समर्थकांचा पलटवार

महादेव मुंडे खून प्रकरणावरून दोन्ही 'राष्ट्रवादी' भिडल्या; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, समर्थकांचा पलटवार;
परळी : परळी येथील पिग्मी एजंट व प्लॉट व्यावसायिक महादेव मुंडे खून प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणाचा तपास ८६५ दिवस उलटूनही मार्गी लागत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमनेसामने आले आहेत.
राजेभाऊ फड यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे सरचिटणीस राजेभाऊ फड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केले. महादेव मुंडे यांच्या खुनाला ८६५ दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही. या प्रकरणाच्या तपासावर आमदार धनंजय मुंडे यांचा राजकीय दबाव असल्यामुळेच आरोपी मोकाट फिरत आहेत, असा दावा फड यांनी केला. संशयितांच्या ब्रेन मॅपिंगचे अहवाल एसआयटीने तात्काळ जाहीर करावेत आणि या प्रकरणात धनंजय मुंडे यांनाही आरोपी करावे, अशी मागणी त्यांनी केली. २० मार्चपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
धनंजय मुंडे समर्थकांचा प्रतिहल्ला ; 'फडांना सहआरोपी करा'
आमदार धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप समर्थकांनी "बिनबुडाचे आणि राजकीय प्रेरित" असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत. परळी बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे आणि प्रा. मधुकर आघाव यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, या प्रकरणाच्या एसआयटी तपासासाठी स्वतः धनंजय मुंडे आग्रही होते. "ब्रेन मॅपिंग किंवा नार्को टेस्टचे गोपनीय अहवाल राजेभाऊ फड यांच्याकडे कुठून आले? हे अहवाल त्यांनी लीक केले असतील तर त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावे," अशी मागणी प्रा. आघाव यांनी केली. तसेच, या आरोपांमुळे आमदार मुंडे यांची बदनामी झाली असून कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन फड यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, अशी माहिती समर्थकांनी दिली.