मूल अदलाबदल प्रकरणी डॉक्टर बडे, खुलताबादकर कार्यमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:46 IST2018-06-02T00:46:51+5:302018-06-02T00:46:51+5:30
हलगर्जीपणा झाल्यामुळे मुली ऐवजी मुलगा अशी दप्तरी नोंद झाली आणि राज्यभर मुल अदलाबदल झाले म्हणून जिल्हा रुग्णालय बदनाम झाले. मुलाची डीएनए तपासणी केली असता हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात डॉ. अनिल खुलताबादकर, डॉ. परमेश्वर बडे यांना कार्यमुक्त करण्यात आले.

मूल अदलाबदल प्रकरणी डॉक्टर बडे, खुलताबादकर कार्यमुक्त
बीड : हलगर्जीपणा झाल्यामुळे मुली ऐवजी मुलगा अशी दप्तरी नोंद झाली आणि राज्यभर मुल अदलाबदल झाले म्हणून जिल्हा रुग्णालय बदनाम झाले. मुलाची डीएनए तपासणी केली असता हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात डॉ. अनिल खुलताबादकर, डॉ. परमेश्वर बडे यांना कार्यमुक्त करण्यात आले.
ही हलगर्जी डॉ.दीपाली मोराळे, डॉ. अनिल खुलताबादकर, डॉ. परमेश्वर बडे व चार परिचारिकांनी केल्याचे समोर आले होते. डॉ.मोराळेसह इतर चार परिचारीकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, यासाठी आरोग्य उपसंचालकांना प्रस्ताव सादर केला आहे. या सर्वांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. छाया राजू थिटे (हिंगोली, ह.मु.रा.कुप्पा ता.वडवणी) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता बाळाला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात झाली. त्यानंतर वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी त्याला खाजगी रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी येथेही मुलाची नोंद केली. त्याप्रमाणे रात्रीच बाळाला बसस्थानकासमोरील श्री बाल रूग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी मात्र मुलगी अशी नोंद केली. त्याच्यावर दहा दिवस उपचार केल्यानंतर सुट्टी दिली. यावेळी नातेवाईकांच्या हाती मुलगी पडल्याने ते भांबावले आणि त्यांनी संताप व्यक्त करीत बाळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली होती.
त्यानंतर पोलिसांनी डॉक्टर, परिचारीकांचे जबाब नोंदविले आणि बाळाचे रक्त घेऊन डिएनए तपासणीसाठी पाठविले होते. हा अहवाल बुधवारी मिळाला आणि ते बाळ थिटे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा रूग्णालयातील शुभांगी नाईकवाडे, सपना राठोड, संगिता बनकर्न, सुनिता पवार या चार परिचारीकांसह डॉ.दीपाली मोराळे, डॉ.परमेश्वर बडे आणि डॉ.अनिल कुत्ताबादकर यांच्या हलगर्जी व गलथान कारभारामुळेच हा प्रकार झाल्याचे समोर आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी याची गंभीर दखल घेत यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाईस सुरूवात केली. यातील कंत्राटी असणाºया डॉ.बडे व डॉ. खुलताबादकर यांच्यावर कार्यमुक्तीची कार्यवाही केली आहे. तर चार परिचारीका व मुलगाच आहे असे सांगणाºया डॉ.मोराळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, यासंदर्भात प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. या दोषींवर तात्काळ कारवाई करून प्रतिमा उंचावण्याचे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिष हरीदास, डॉ.संजय पाटील, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्यावर असणार आहे.
‘ती’ आई-वडिलांच्या स्वाधीन
दरम्यान, या प्रकरणातील ती मुलगी शुक्रवारी दुपारी छाया राजु थिटे यांच्या स्वाधीन करण्यात आली.
बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांच्या टिमने त्यांना सहकार्य केले.
औरंगाबाद येथून तिला शासकीय वाहनातून बीडला आणले. मुलगी हातात पडताच आई-वडिलांच्या चेहºयावर हास्य फुलले.
विभाग प्रमुखांवरही कारवाई
अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.इलियास खान यांची वर्षभरासाठी पगारवाढ थांबविली आहे. परंतु त्यांच्या विभागाकडून झालेल्या हलगर्जीपणा पाहता ही कारवाई केवळ थातुरमातूर आहे. डॉ.इलियास यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाने केल्याची चर्चा सुरू आहे. तसेच डॉ.वर्धमान कोटेचा यांचीही चौकशी होणार आहे.