शासनाकडून केवळ पोकळ घोषणा कृती मात्र शून्य; अशोक चव्हाण यांची बीड येथे टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:50 IST2018-02-16T16:46:19+5:302018-02-16T16:50:04+5:30
शासन शेतकर्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत भाजप सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्र परिषदेत केला. काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने ते बीड येथे आले होते.

शासनाकडून केवळ पोकळ घोषणा कृती मात्र शून्य; अशोक चव्हाण यांची बीड येथे टीका
बीड : शासन शेतकर्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत भाजप सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्र परिषदेत केला. काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने ते बीड येथे आले होते.
यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, खा. रजनी पाटील, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी युती सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. बोंडअळीने शेतकरी पूर्णत: अडचणीत आला, त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. कर्जमाफी केल्याचा आव शासन करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र कुणालाही कर्जमाफी झाली नाही. पीक विम्याचे पैसे मिळेनात, हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. तर इकडे मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे. या दोघांचे प्रश्न सोडविण्याऐवजी शासनाने मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी जाळी बसविली. अशा जाळ्या कुठे-कुठे बसविणार? असा प्रश्न उपस्थित करुन ते म्हणाले, प्रश्न जर वेळेत सुटले तर आत्महत्या आटोक्यात येतील. पूर्ण महाराष्ट्रात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले, पावणे दोन लाख पदे रिक्त असतानाही ती भरली जात नाहीत. त्यामुळे बेरोजगारात असंतोष आहे. पदे रद्द न करता जागा भराव्यात, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची तयारी झाली आहे. आघाडी करायची की नाही? याचा निर्णय बाकी असून, चर्चा चालू आहे, नेहमीपेक्षा वेगळा फार्म्यूला काय करता येईल? यासाठी मंथन चालू आहे. आघाडीच्या संदर्भात २२ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, त्यात यावर चर्चा होईल, असे ते म्हणाले. लातूर, उस्मानाबाद आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यावेळी बीडला संधी मिळणार काय? असे विचारले असता ते म्हणाले, या संदर्भातही चर्चा होणार आहे. बीड जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. याच पत्र परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शासनावर टीका केली. शेतकर्यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.