नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना कार दरीत कोसळली; शिक्षक पतीचा मृत्यू, पत्नी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 10:33 IST2023-03-06T10:33:18+5:302023-03-06T10:33:40+5:30
समोरील गाडीने हुल दिल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला

नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना कार दरीत कोसळली; शिक्षक पतीचा मृत्यू, पत्नी जखमी
- नितीन कांबळे
कडा ( बीड) - नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना अज्ञात वाहनाने हुल दिल्याने चालकाचा ताबा सुटुन कार दरीत कोसळुन झालेल्या अपघातात शिक्षक पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी जखमी झाल्याची घटना बीडसांगवी येथील महादेव दरा येथील घाटात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. अंबादास पांडुरंग उगले असे मयत शिक्षकांचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील थेटे सांगवी येथील उगले हे गेवराई येथील एका शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करतात. तर त्यांची पत्नी आणि मुले लातूर येथे असतात. कडा येथील एका नातेवाईकांच्या अंत्यविधी असल्याने उगले हे कारने ( क्रमांक एम.एच २३,ए.डी.०२४९) आज सकाळी गेवराईवरून निघाले. तर पत्नी लातूरवरून सावरगाव घाटपर्यंत सहकाऱ्यांच्या गाडीत आली होती.
शिक्षक उगले यांनी पत्नीला सावरगाव घाट येथून सोबत घेत कारमधून निघाले. दरम्यान, बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात अज्ञात वाहनाने हुल दिल्याने ताबा सुटुन कार खोल दरीत कोसळली. यात अंबादास पांडुरंग उगले यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी सगुना या जखमी झाल्या.