आता कहर झाला; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 15:37 IST2020-08-21T15:34:39+5:302020-08-21T15:37:40+5:30
विशेष म्हणजे संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन आहे.

आता कहर झाला; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला
कडा (ता.आष्टी) : जैन मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला २४ तास लोटत नाही तोच टाकळसिंग गावातील पंचायत समिती सभापतीचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ दशरथ जगताप यांचे एकत्र कुटुंब आहे. घरात पंधरा सदस्य आहेत. यातील तेरा जण नगरला उपचार घेत आहेत. घरी दिव्यांग मुलगा व भाचा आहेत. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट, कपडे, याची उचका पाचक करीत सोने, रोख असा लाखो रुपयांचा ऐवज चोरला. हा सगळा प्रकार त्यांच्या भाच्याने सकाळी पाहिल्यावर सभापतींना माहिती दिली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अद्याप कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आष्टी तालुक्यात सध्या आष्टी पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
तीस तोळे सोने होते कपाटात
घरातील कपाटात ठेवलेले तीस तोळे सोने होते. त्यापैकी अठरा तोळे चोरीला गेले. बाकीचे सोने कपड्यात गुंडाळले असल्याचे दिसून आले. दीड लाख रुपये रोख होते. त्यापैकी फक्त ३० हजार रुपये कपाटात सापडले. आपण कुटुंबियांसमवेत नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहोत. डिस्चार्ज मिळाला की स्वत: आष्टी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देणार असल्याचे सभापती बद्रीनाथ जगताप यांनी लोकमतला सांगितले.