एक नव्हे दोन पेढे; बीड जिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांत जन्मले ४२ जुळे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:31 IST2025-10-04T15:30:54+5:302025-10-04T15:31:15+5:30
यातील काहीचे सिझेरियन झाले आहे. तर काही प्रसूती सामान्य पद्धतीने झाल्या आहेत.

एक नव्हे दोन पेढे; बीड जिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांत जन्मले ४२ जुळे !
बीड : पूर्वी क्वचितच दिसणाऱ्या जुळ्या आणि तिळ्या मुलांचे जन्म आता वाढले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या या बालकांच्या संख्येवरून याची कल्पना येते. कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान आणि अनुवांशिकता या प्रमुख वैद्यकीय कारणांमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही वाढती आकडेवारी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे.
जिल्ह्यात नऊ महिन्यांत ४२ जुळ्यांचा जन्म झाला आहे. यातील काहीचे सिझेरियन झाले आहे. तर काही प्रसूती सामान्य पद्धतीने झाल्या आहेत.
जुळे-तिळे जन्माची कारणे काय?
- अनुवांशिकता : कुटुंबात (आई किंवा वडील) जुळे किंवा तिळे होण्याचा इतिहास असल्यास, हे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढते.
- कृत्रिम गर्भधारणेमुळे प्रमाण वाढले: टेस्ट ट्यूब बेबी किंवा इतर औषधांमुळे गर्भाशयात एकापेक्षा जास्त भ्रूण वाढतात, ज्यामुळे जुळे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
- आईचे वय: तज्ज्ञांनुसार, ज्या महिलांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यामध्ये जुळी मुले होण्याची शक्यता किंचित जास्त असते.
प्रसूतीनंतर बाळांची काळजी
जुळी मुले सहसा वेळेआधी जन्माला येतात. त्यांना संसर्गापासून दूर ठेवणे आणि योग्य स्तनपान देणे महत्त्वाचे आहे. त्यांना पुरेसा उबदारपणा आणि पोषण मिळेल याची काळजी घ्यावी लागते.
विभाग पूर्णपणे सज्ज
गेल्या काही वर्षांत जुळे आणि तिळे जन्मण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रसूतींसाठी आमचा नवजात शिशू अतिदक्षता विभाग पूर्णपणे सज्ज आहे. जुळ्या बालकांच्या प्रसूतीदरम्यान आणि नंतर आई आणि बाळांची काळजी घेण्यासाठी आम्ही विशेष वैद्यकीय पथकामार्फत सेवा देतो.
- डॉ.एल.आर.तांदळे, निवासी वैद्यकीय अधिकारी बीड