कुठलीही राजकीय घडामोड परळीशिवाय होत नाही; सत्ता नसली तरी विकासनिधी मिळत राहील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 20:26 IST2022-07-15T20:26:01+5:302022-07-15T20:26:49+5:30
जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वागत कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडेंचे परळीकरांना वचन

कुठलीही राजकीय घडामोड परळीशिवाय होत नाही; सत्ता नसली तरी विकासनिधी मिळत राहील
परळी (बीड): राज्यात सत्ता असो वा नसो, मी कुठल्या पदावर असेल नसेल परंतु परळी मतदारसंघाचा विकास निधी कोणीही थांबू शकणार नाही. मी परळी मतदारसंघातील जनतेच्या ऋणात कायम राहील व शेवटच्या श्वासापर्यंत या मातीतील लोकांशी प्रेमाचे, विश्वासाचे नाते कायम ठेवील , असे वचन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी येथील कार्यक्रमात बोलताना दिले.
शहरातील हालगे गार्डन येथे शुक्रवारी आमदार धनंजय मुंडे हे अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते. प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तत्पूर्वी मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे यांनी वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांचे औक्षण केले, धनंजय मुंडे कार्यक्रमात बोलताना पुढे म्हणाले की , परळी मतदारसंघातील लोकांच्या प्रेमामुळे आपण विधानसभेत पोहोचलो, मंत्री झालो, मंत्री असताना सर्वसामान्य लोक विचारू लागले आमचे काय? आता मीच मंत्री नाही त्यामुळे तुमच्या सारखाच आता मी आहे, मंत्री नसल्याचा मला आनंद वाटतो असे ही मुंडे हसत म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात परळीवैजनाथ विधानसभा मतदारसंघाचे नाव, कर्तृत्व मोठे आहे, महाराष्ट्रात कुठलीही राजकीय घडामोड ही परळीला विचारल्याशिवाय होत नाही. त्यामुळे प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा निधी कोणीही रोखू शकत नाही. आपण सत्तेत नसताना व महाराष्ट्र व देशाच्या सत्तेत असणारे लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचा निधी रोखू शकले नाहीत, असेही मुंडे म्हणाले.
यावेळी आमदार संजय दौंड, पृथ्वीराज साठे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी, परळी नगरपालिकेचे गटनेते वाल्मीक कराड, बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, शिवाजी सिरसाठ,, माजी नगराध्यक्ष सोमनाथप्पा हालगे, चंदूलाल बियाणी,बाजीराव धर्माधिकारी ,शिवकुमार व्यवहारे, नामदेवराव आघाव, संगीता तूपसागर, पल्लवी भोईटे, अर्चना रोडे ,प्रा विनोद जगतकर,,प्रा मधुकर आघाव, गोपाळराव आंधळे, माऊली गडदे, शिवदास बिडगर, रामेश्वर कोकाटेसह इतर उपस्थित होते. माजीमंत्री धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली होती.