No one should worry about my future; I am determined to make a decision -Pankaja Munde | माझ्या भविष्याची चिंता कोणी करू नये; निर्णय घेण्यास मी खंबीर

माझ्या भविष्याची चिंता कोणी करू नये; निर्णय घेण्यास मी खंबीर

ठळक मुद्देअफवा पसरविणाऱ्यांना पंकजा मुंडेनी फटकारले मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात

अंबाजोगाई -  मी शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? अशा अफवा पसरवत माझ्याबद्दलची भविष्यवाणी काहीजण विनाकारण करत आहेत. मात्र, पक्षाने मला भरपूर दिले असून निर्णय घेण्यास मी खंबीर आहे,  अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अफवा पसरविणाऱ्यांचा समाचार घेतला. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला राष्ट्रीय सचिवपद देऊन विश्वास टाकला आहे. तो विश्वास मी सार्थ ठरवून दाखवीन असे अभिवचनही मुंडे यांनी यावेळी दिले. 

अंबाजोगाईत आ. नमिता मुंदडा यांच्यावतीने शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांच्या जाहिर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देतांना पंकजा मुंडे बोलत होत्या.  यावेळी व्यासपिठावर आ. नमिता मुंदडा, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, मोहन जगताप, बाळासाहेब दोडतले, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोरोनाचा कालावधी असल्यामुळे मी मुंबईत अडकून राहिले. मी जर घराबाहेर पडले असते तर माझ्या भोवती मोठा जमाव जमा झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. लोकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मी स्वत:च घराबाहेर निघणे टाळले. याचा मोठा गैरअर्थ करून पंकजाताई घराबाहेर पडत नाहीत. अशा अफवा पसरविण्यात आल्या. कोरोनाच्या काळात एकही सत्ताधारी कोविड सेंटरकडे फिरकला नाही. अशा स्थितीत खा. डॉ. प्रीतम मुंडे व अक्षय मुंदडा प्रत्येक कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेत होते. त्यांना दिलासा देत होते. 

पक्षाने मला भरपूर दिले 
माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा. अशा शब्दात अफवा पसरविणाऱ्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.  

लोकांपासून दुरावले नाही 
मी या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराभवांचा अनुभव घेतला. यात मी नवीन नाही. जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने  कामाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा. अशा शब्दात त्यांनी  नाव न घेता टीका केली. 

पंकजाताईंच्या पराभवामुळे आजवर सत्कार स्वीकारला नाही
यावेळी बोलतांना अक्षय मुंदडा म्हणाले की, पंकजा मुंडे व माझ्या कुटुंबियांचे कौटुंबिक नाते आहे. नमिता यांच्यावर पंकजाताईंनी विश्वास टाकला व त्यांना निवडून आणले. पंकजाताईंच्या पराभवामुळे आम्ही आजपर्यंत कसलाही सत्कार स्वीकारला नाही. आज त्यांचा पहिला सत्कार केला. आणि आमच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे अक्षय मुंदडा यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. नमिता मुंदडा यांनी केले. संचालन वैजनाथ देशमुख यांनी तर उपस्थितांचे आभार अ‍ॅड. संतोष लोमटे यांनी मानले. यावेळी विविध संस्था व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला.

Web Title: No one should worry about my future; I am determined to make a decision -Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.