"No one can live without money in a police account!", Audio clip of two policemen goes viral | "पोलीस खात्यात बिगर पैशाचा कोणीच जगू शकत नाही !", दोन पोलिसांच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

"पोलीस खात्यात बिगर पैशाचा कोणीच जगू शकत नाही !", दोन पोलिसांच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

ठळक मुद्देबीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी निलंबितस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांचा उल्लेख

बीड : बिगर पैशाचा पोलीस खात्यात कोणीच जगू शकत नाही, हा संवाद आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा. ही आॅडिओ क्लिप व्हायरल होताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी परमेश्वर सानप व गणेश हंगे या दोघांना मंगळवारी निलंबित केले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारींची चर्चा या क्लिपमुळे पुन्हा जोर धरली आहे. 

लाचेचे पैसे देण्या-घेण्याची सखाराम सारूक आणि परमेश्वर सानप या दोन पोलिसांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रतिबंधात्मक कारवाई विभागात दोघांचीही ड्यूटी.  कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी किती पैसे लागतात, यासंदर्भात या दोघांमध्ये झालेला हा संवाद आहे. या क्लिपमध्ये स्थागुशाचे कर्मचारी रामदास तांदळे यांच्या आरोपी असलेल्या पाहुण्याच्या संदर्भात हे दोघे संवाद करत आहेत. ही क्लीप व्हायरल होताच या संवादातील सानप व त्याचा सहकारी हंगे यास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तीन दिवसांपूर्वीच नियंत्रण कक्षात हलविले होते. निलंबनाची कारवाई केली असली तरी, क्लिपचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, याचीदेखील सखोल चौकशी होणार असल्याचे पोद्दार यांनी सांगितले. 

ऑडिओ क्लिपमधील संपादित संवाद (त्यांच्याच शब्दांत) :
 

सखाराम सारुक : तांदळ्याचे मेव्हणे जीवन सानप आलेत का तिथं?
परमेश्वर सानप :  मला नाही माहिती, जेलमधून सुटलेले बरेच लोकं हायत इथं.
सारुक : त्यांना ५ हजार रुपये कोणी मागितले? 
सानप  : पोलिसांनी मागितले असतील, मला नाही माहिती.
सारुक : सकाळी तर म्हणाले ना जेलचे आरोपीकडून एक रुपयापण घेत नाही.
सानप : कोण म्हणालं, सांगितले पीआयने घ्यायला.
सारुक : बावीच्या पाहुण्यांचे कोणी घेतले ८ हजार. 
सानप : पीआय साहेबांनी घेतले, फोन लाव ना पीआयला. 
सारुक : तुम्हाला म्हणलं तांदळ्याचा फोन येतोय तेवढं करा .
सानप :  ऐकून घे, इथं २० आरोपीत बाहेर उभे. मला अजून माहिती नाही कोणय ते. तू सांगायला १०८ जेलचे आरोपी सुटले, कुठं तक्रार करायची तर करं. धमक असंल तर बोलना पीआयला.
सारुक : माझा पाव्हणा नाही, तांदळ्याचा पाव्हणा आहे.
सानप : तांदळे, काय एलसीबीला नेमणुकीला नाही का? 
सारुक : ते गावाकडे हाय सद्या. त्यामुळं मी बोललो
सानप : अरे बाबा कुठंबी असला तरी, एक फोन लावायचा. जेलचा एक आरोपी माझा पाहुणाय, त्याला थोडी मदत करा, असं साहेबाला बोलायचं. घेतले पैसे तर काय फरक पडतो? पोलिसाचं कामंचय 
सारुक : पोलिसाचं काम हे १०० टक्के खरंय. बिगर पैशाचा पोलीस खात्यात कोणीच राहू शकत नाही. पैसा सगळ्यालाच प्यारा आहे. काही अडचण नाही मी तांदळेला सांगतो बुवा. माझ्या घरून ५ हजार घेऊन जा आणि कदमला दे. विषय संपला.
सानप : काय सांगायचं ते सांग, मला टेकीचं बोलू नको, तुझ्या घरून घेऊन जा नाही तर व्याजानं काढ.
सारुक : त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून घरून घेऊन जा म्हणून सांगतो. वाकडं काय बोललो?
सानप : अरे बाबा तुझ्या घरात लय पैसेत ना तर रस्त्यावर टाक. 
सारुक : त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणूनच बोलतोय. 
सानप : इतकं लांब का जातोय? साहेबांना जा बोल सगळं, पाहुणाय ना? 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांचा उल्लेख
प्रतिबंधात्मक कारवाईसाठीदेखील पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. आता व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक यांनीच जेलमधील आरोपीचे पैसे घेण्यास सांगितले आहे, असा उल्लेख आहे. त्यामुळे हा विषय जिल्ह्यात पुन्हा चर्चेला आला आहे. 

दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित 
दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीअंती पुढील कार्यवाही केली जाईल.
- हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक बीड 

Web Title: "No one can live without money in a police account!", Audio clip of two policemen goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.