चालकाकडून पैसे भेटले नाहीत, दरोडेखोरांनी ट्रकमधील ६ टन साखर दुचाकीवरून पळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 19:15 IST2023-01-30T19:14:56+5:302023-01-30T19:15:50+5:30
सहा आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतले

चालकाकडून पैसे भेटले नाहीत, दरोडेखोरांनी ट्रकमधील ६ टन साखर दुचाकीवरून पळवली
परळी (बीड) : चालकास चाकूचा धाक दाखवून पैश्याची मागणी करीत ट्रकमधील तब्बल १२ पोते ( सहा टन ) साखर लंपास केल्याची घटना रविवारी ( दि 29) पहाटे घडली. दरम्यान, या प्रकरणी 6 जणांना परळी शहर पोलिसांनी काही तासाच ताब्यात घेतले. यापैकी चौघा युवकांना अटक केले असून दोघे 17 वर्षीय बालक असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून एक ट्रक 30 टन साखर घेऊन शनिवारी ( दि 28) वर्धा जिल्ह्यातील आर्ची व कारंजा या ठिकाणी रवाना झाला. परळी मार्गे ट्रक जात असताना रविवारी ( दि. 29 ) पहाटे दुचाकीवरील सहा जणांनी ट्रकचा पाठलाग केला. चालक सतीश रामभाऊ धंदर ( रा गाडगे नगर ,शेगाव परिसर अमरावती ) हे परळी बसस्थानकासमोर चहा पिण्यासाठी थांबले असता दुचाकीवरील सहा जण तेथे आले. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवत चालकाकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. चालकाने पैसे नाहीत असे म्हणताच ट्रकमध्ये झोपलेल्या दुसऱ्या ड्रायव्हरला व अन्य एकास चाकूच्या धाकावर पैश्यांची मागणी केली. पैसे मिळत नसल्याने संतप्त दरोडेखोरांनी जबरदस्तीने ट्रकमधील साखरेचे 12 पोते (6 क्विंटल साखर) दुचाकीवर लादून घेऊन गेले.
दरम्यान, या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालक सतीश धंदर यांनी फिर्याद दिली. परळी शहर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सपोनि चंद्रकांत गोसावी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध लावला. सहा पक्की दोघे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी साखर जप्त करत चार जणांना ताब्यात घेतके. सुमित दशरथ जाधव ( 24), बालाजी अंकुश दहिफळे ( 23), वैभव दशरथ कापसे (22), नागेश अशोक शिंदे (21, सर्व राहणार परळी ) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना कोर्टात हजर केले असता ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दोघ अल्पवयीन मुलांना नोटीस बजावून पालकांच्या स्वाधीन केले.