अंबाजोगाई : दिव्यांग बांधवांसाठी शासन निर्णयाप्रमाणे दरवर्षी पाच टक्के निधी ग्रामपंचायतीने खर्च करायचा असतो.परंतु अंबाजोगाई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधवांचा निधी खर्च केलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दिव्यांग बांधव शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहेत. गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना सूचना देऊन दिव्यांगाचा निधी खर्च करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाम सरवदे यांनी केली आहे.
गोपालनातून शेतकऱ्यांनी साधली प्रगती
अंबाजोगाई : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लागलेला खर्च वसूल होणेही दुरापास्त झाले आहे. यावर पर्याय म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गोपालन सुरू केले आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊन गोपालनाच्या माध्यमातून शेतीला मोठ्या प्रमाणात शेणखतही उपलब्ध होऊ लागले आहे. यामुळे पुन्हा शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळला आहे.
आठवडी बाजार बंद, व्यापारी संकटात
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालु्क्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने अंबाजोगाई तालुक्यात भरणारे आठवडी बाजार बंद केले आहेत. अंबाजोगाई शहरात मंगळवार व शुक्रवारी घाटनांदूर येथे भरणारा रविवारचा आठवडी बाजार, ममदापूर येथील शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. बाजार बंद ठेवल्यामुळे छोटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून बाजारास परवानगी द्यावी. अशी मागणी बसव बिग्रेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी केली आहे.
महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात थकबाकीदार ग्राहकांची वीजजोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठविण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत प्रवाह खंडित केला जात आहे. अचानकच कोरोनाच्या कालावधीत वीज बिल भरण्याचे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे
अंबाजोगाई : कोरोना प्रतिबंधासाठी समाजात सामूहिक प्रतिकार शक्ती विकसित होण्यास लसीकरण परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वत: पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे यांनी केले आहे.