नगरपंचायतला नाही स्वतंत्र अग्निशमन गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST2021-04-02T04:34:42+5:302021-04-02T04:34:42+5:30
शिरूर कासार : तालुका निर्मितीला तब्बल २२ वर्षे लोटले असले तरी नगरपंचायतला स्वतंत्र व हक्काची अग्निशमन गाडी नसल्याने ...

नगरपंचायतला नाही स्वतंत्र अग्निशमन गाडी
शिरूर कासार : तालुका निर्मितीला तब्बल २२ वर्षे लोटले असले तरी नगरपंचायतला स्वतंत्र व हक्काची अग्निशमन गाडी नसल्याने दुर्दैवाने प्रसंग ओढवलाच तर मदतीसाठी किमान ४० किलोमीटरचे अंतर गाठेपर्यंत घटनास्थळी होत्याचे नव्हते पाहण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी एखादी सुविधा कमी-अधिक चालेल मात्र हक्काची अग्निशमन गाडी नगरपंचायतजवळ असणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर व्यवसाय, बाजार, कार्यालय आदी बाबी अनायसे वाढल्या गेल्या. मात्र शहराशिवाय तालुक्याच्या सुरक्षेसाठी व भडकलेला अग्नी शांत करण्यासाठी जी महत्त्वपूर्ण गरज असते त्या गाडीकडे अद्याप लक्ष गेले नाही. आग अथवा दुर्घटनेच्या वेळी बीड, पाटोदा, आष्टी किंवा शेजारी पाथर्डी तालुक्यातून गाडीची मदत म्हटले तरी किमान ४० किलोमीटर अंतर पार करावे लागते. शिवाय मदतीची गाडी तत्काळ सुटेल, असेही सांगता येणार नाही अशा तास दीड तासांत अग्नी रौद्ररूप धारण करेल आणि होत्याचे नव्हते होऊ शकते. तालुक्यात पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, कापूस खरेदी, कापड दुकाने, रासायनिक खत, औषधी दुकानांची संख्या पाहता त्यांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी अग्निशमन गाडी आवश्यक बनली आहे. शहरात सर्व सुविधा कमी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत, अंतर्गत रस्तेही बऱ्यापैकी झाले , मूलभूत सुविधा झाल्या मात्र अनाहूतपणे आगीसारखी घटना घडल्यास काय? याच विचार झाला नाही. नगरपंचायतने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाकडून सुध्दा तालुक्याच्या ठिकाणी किमान एक तरी गाडी असावी, असे धोरण राबविल्यास दिलासादायक होईल.
प्रस्ताव पाठवला
सहा महिन्यांपूर्वी शिरूर शहरासाठी अग्निशमन गाडीबाबत संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. नगरपंचायत अग्निशमन गाडी गरज पूर्ण करेल, असे प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.