माझ्या पतीला टॉर्चर केलं गेलं, ते आत्महत्या करूच शकत नाहीत; मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:13 IST2026-01-24T15:12:24+5:302026-01-24T15:13:59+5:30
बीड येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील सचिन नारायण जाधवर यांनी १७ जानेवारी रोजी कपिलधारवाडी परिसरात टोकाचे पाऊल उचलले होते.

माझ्या पतीला टॉर्चर केलं गेलं, ते आत्महत्या करूच शकत नाहीत; मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीचा दावा
बीड : "माझ्या पतीला गेल्या महिनाभरापासून प्रचंड मानसिक त्रास दिला गेला, ते कधीच आत्महत्या करू शकत नाहीत. माझ्या मुलाला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला, तसेच वाहनाला धक्का मारून शिवीगाळ करण्यात आली होती", असा खळबळजनक दावा मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केला आहे. या वक्तव्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनावरही त्यांनी निशाणा साधला आहे.
बीड येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील सचिन नारायण जाधवर यांनी १७ जानेवारी रोजी कपिलधारवाडी परिसरात टोकाचे पाऊल उचलले होते. त्यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये सहायक आयुक्त दिलीप फाटे यांनी दिलेल्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, घटनेला आठवडा उलटूनही पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने मयुरी जाधवर यांनी शुक्रवारी कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.
मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न
माध्यमांशी बोलताना मयुरी जाधवर यांनी धक्कादायक खुलासे केले. त्या म्हणाल्या की, "माझ्या पतीला महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून टॉर्चर केले जात होते. ते प्रचंड तणावात होते आणि त्यांनी आपण खूप 'डिस्टर्ब' असल्याचेही मला बोलून दाखविले होते. केवळ पतीलाच नाही, तर शाळेत गेलेल्या माझ्या मुलाचे काही मुले पाठवून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. ऑफिसच्या बाहेर त्यांच्या वाहनाला मुद्दाम धक्का मारून शिवीगाळ करण्यात आली. हे सर्व त्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठीच केले जात होते."
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
"आम्ही वारंवार विनंती करूनही पोलीस आम्हाला मूळ सुसाईड नोट दाखवायला तयार नाहीत. आमची फिर्याद घेतली जात नाही. पोलिसांना नेमका कोणाचा दबाव आहे?" असा रोखठोक प्रश्न मयुरी जाधवर यांनी उपस्थित केला आहे. सचिन जाधवर यांच्या बंधूंनीही या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बीड ग्रामीण ठाण्यात गोंधळ
पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर जाधवर कुटुंबासह इतर नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते बीड ग्रामीण ठाण्यात गेले. येथे गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने या लोकांनी पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून घेतो, असे आश्वासन दिले.