माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:52 IST2025-11-07T19:41:06+5:302025-11-07T19:52:10+5:30
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे यांचा समावेश आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरुन रचण्यात आल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, खुणे यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या, यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
अमोल खुणे यांच्या पत्नी म्हणाल्या,एक महिन्यापासून माझ्या पतीला दारु पाजत होते. त्या नशेमध्ये त्यांच्याकडून हे सगळे करून घेतले जात होते. मात्र माझे पती मराठा आंदोलक जरांगे पाटलांचे सुरुवातीपासून कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये व स्टेटसला नेहमी जरांगे पाटलांचे फोटो असतात. ते जरांगे पाटलांना देव मानतात. माझ्या पतीला या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी खुणे यांच्या आईनेही प्रतिक्रिया दिली. त्यांनी माझ्या मुलाचा प्रकरणात काहीही संबंध नसल्याचा दावा केला. यावेळी खुणे यांच्या आईला आणि पत्नीला अश्रू अनावर झाले. दरम्यान, प्रकरणाने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोन जणांनी जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचत असल्याची तक्रार जालना पोलिसांकडे बीडच्या काही कार्यकर्त्यांनी केली होती. या तक्रारीवरुन ही कारवाई केली.
धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
"माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाहीये. त्याने जी घटना करायला नको होती, ती त्याने केली आहे. हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली आहे. राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही", असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. मी नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार, असेही प्रत्युत्तर जरांगेंनी मुंडेंना दिले आहे.
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची अडीच कोटी रुपयांमध्ये सुपारी दिली, असे जरांगे म्हणाले. त्यांनी कांचन नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला. तो धनंजय मुंडेंचा पीए असल्याचेही जरांगे म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. "मला माहिती मिळाली होती. ती मी पोलिसांना दिली. घातपाताच्या प्रकरणात आठ ते दहा जण आहेत. त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्या प्रकरणाची चौकशी व्हायला नको का?", असे जरांगे म्हणाले.
"धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायची म्हणत असतील, तर मी नार्को टेस्ट करून घ्यायला तयार आहे. उद्या मी गृह मंत्रालयात, न्यायालयात, पोलीस अधीक्षक कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार. धन्या मी तुझ्यासारखा नाहीये. मी जातवाण आहे. मी असे खुनाचे, घातपाताचे आरोप करू शकत नाही. नार्को टेस्टला सगळ्यात आधी जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो?, अशी टीका जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केली आहे.