मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:47 IST2024-12-16T12:47:47+5:302024-12-16T12:47:47+5:30

पंकजा मुंडे दुसऱ्यांदा, तर धनंजय मुंडेंची मंत्रिपदाची हॅटट्रिक; परळी तालुकाच ठरला जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू

Munde brother and sister ministers together for the first time; Who has the guardianship of Beed district now? | मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?

मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?

बीड : गोपीनाथ मुंडे असताना परळी तालुकाच जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. ही परंपरा मुलगी आणि पुतण्याने कायम ठेवली आहे. नव्या मंत्रीमंडळात भाजपकडून पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाची ही हॅटट्रिक आहे. परळी तालुक्यात आणि त्यातही एकाच कुटुंबात मुंडे बहीण-भावावर नव्या सरकारने जबाबदारी दिली आहे. असे असले, तरी आता जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे जाणार? याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात राजकीय घडामोडी झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या बहीण-भावाने उमेदवार असताना पहिल्यांदाचा एकमेकांचा प्रचार केला. यात पंकजा यांना अपयश आले, तरी त्यांना नंतर विधान परिषदेवर पक्षाने संधी दिली. तर, धनंजय मुंडे यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावर विक्रमी १ लाख ४१ हजार मतांनी गुलाल उधळला. सलग दोन मंत्रिपदांचा अनुभव असलेल्या धनंजय मुंडे यांना पक्षाने तिसऱ्यांदा जबाबदारी दिली. या दोघा बहीण-भावांनी रविवारी नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी दोघांचेही कुटुंब उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांची राजकीय वाटचाल कशी?
१९९५ साली धनंजय मुंडे राजकारणात सक्रीय झाले. काका गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत राहून त्यांनी राजकारणातील बारकावे अनुभवले. २००२ साली ते पहिल्यांदा पट्टीवडगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर २००७ साली ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले. त्यांच्या कामाची चुनूक पाहून त्यांना भाजपने २०१० साली पहिल्यांदा विधान परिषद सदस्य केले, परंतु २०१३ साली त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. येथेही त्यांना विधान परिषद सदस्य केले. वक्तृत्व शैली आणि आक्रमकता पाहून पुढच्याच वर्षी विरोधी पक्ष नेतेही केले. २०१९ साली बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव करून ते पहिल्यांदा विधानसभा सदस्य आणि मंत्रीही झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यावर पुन्हा एकदा मंत्री झाले. आता तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत हॅटट्रिक केली आहे.

पंकजा मुंडे यांची राजकीय वाटचाल कशी?
वडील गोपीनाथ मुंडे यांच्याकडून त्यांनी राजकीय धडे घेतले. २००४ साली जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. २०१३ साली त्यांना भाजपकडून युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. २००९ साली पहिल्यांदा विधानसभा सदस्य. २०१४ मध्ये त्यांनी विधानसभेत विजय मिळवला. यात त्यांना मंत्रिपदही मिळाले. २०१९ ला पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांना राष्ट्रीय सचिव केले. २०२० मध्ये मध्य प्रदेशचे सह प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषद सदस्य करण्यात आले. आता नव्या मंत्रीमंडळात त्यांच्या गळ्यात माळ टाकली. आता त्या दुसऱ्यांदा मंत्री झाल्या आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना स्टार प्रचारक केले होते.

विरोधात लढले, अन् मंत्रीही झाले
२०१४ आणि २०१९ साली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. २०१४ साली पंकजा मुंडे विजयी झाल्या होत्या तर २०१९ धनंजय मुंडे यांनी गुलाल उधळला होता. दोनवेळा हे बहीण-भाऊ विधानसभेत आमने-सामने आले होते. परंतु राज्यातील राजकीय घडामोडींमुळे हे दोघेही आता एकत्र आले. दोघेही मोठे नेते असल्याने त्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. आतापर्यंत दोघेही विरोधी बाकावर असल्याने सोबत कधीही मंत्रिपद मिळाले नव्हते. परंतु आता दोघेही महायुती असल्याने पहिल्यांदाच बहीण-भावाला सोबत मंत्रिपद मिळाले आहे.

धस, सोळंकेंच्या पदरी निराशा
मुंडे-बहीणभावासोबतच आष्टीतील भाजपचे आ. सुरेश धस आणि माजलगावचे राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांचीही नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती. त्यांच्या समर्थकांनी पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणीही केली होती. एकाच घरात दोन मंत्रिपदे मिळणार नाहीत, त्यामुळे सुरेश धस यांना अपेक्षा होती तर आपली शेवटची टर्म असल्याने मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा सोळंकेंना होती. परंतु दोघांच्याही पदरी निराशा आली.

सुरेश धसांकडून पंकजा मुंडेंवर आरोप
विधान सभेचा गुलाल लागताच आष्टीत भाजपचे सुरेश धस यांनी विजीय सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरच निशाणा साधला. याची राज्यभर चर्चा झाली होती. याच आरोपामुळे पंकजा यांना धक्का बसून धस यांना मंत्रिपद मिळेल, असे वाटत होते. परंतु पक्षाने पंकजा यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मंत्री केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार?
जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली. त्यामुळे आता पालकमंत्री कोण होणार? याचीही चर्चा सुरू झालेली आहे. धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही जिल्ह्याचे पालकत्व सांभाळलेले आहे. आता पुन्हा एकदा या दाेघांपैकी एकावर ही जबाबदारी दिली जाणार आहे. परंतु नवे पालकमंत्री कोण असणार? याचीही उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

Web Title: Munde brother and sister ministers together for the first time; Who has the guardianship of Beed district now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.