जन्मदातीची दहशत, सावत्र पित्याकडून छळ... १५ वर्षांच्या मुलीला खाकीने दिला 'जिव्हाळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 12:03 PM2022-01-26T12:03:25+5:302022-01-26T12:04:19+5:30

अखेर पोलिसांनी तिला जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात हक्काचा सहारा मिळवून दिला.

Mother-in-law's terror, step-father's harassment ... Khaki gives 'affection' to 15-year-old girl | जन्मदातीची दहशत, सावत्र पित्याकडून छळ... १५ वर्षांच्या मुलीला खाकीने दिला 'जिव्हाळा'

जन्मदातीची दहशत, सावत्र पित्याकडून छळ... १५ वर्षांच्या मुलीला खाकीने दिला 'जिव्हाळा'

googlenewsNext

बीड : जन्मदात्या आईचा धाक, सावत्र पित्याकडून मारहाण, छळ... या नित्याच्या जाचाला कंटाळलेल्या १५ वर्षीय मुलीने २५ जानेवारी रोजी अनवाणी पायाने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. संवेदनशील अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा तिचा कंठ दाटून आला अन् हुंदके देत तिने आपबीती सांगितली. त्यामुळे पोलीसदेखील चक्रावून गेले. आईसोबत राहायचेच नाही यावर ती ठाम राहिली, त्यामुळे अखेर पोलिसांनी तिला जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रात हक्काचा सहारा मिळवून दिला.

ही कहाणी आहे

शहरातील शाहूनगरातील १५ वर्षीय मुलीची. गरीब पण हसत्या, खेळत्या घरात ती खेळत, बागडत मोठी व्हायला लागली. मात्र, वडिलांना दारूचे व्यसन जडले अन् त्यातून आईला रोज मारझोड होऊ लागली. ती पाच वर्षांची होती, तेव्हा आईने पतीपासून फारकत घेतली व दुसऱ्याशी संसार थाटला. काही वर्षे सुखाची गेली, पण नंतर सावत्र पित्याने मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे आईचीही त्यास फूस होती. सावत्र वडील मारहाण करीत असताना आई बघ्याची भूमिका घेत असे. शिवाय धाक दाखवीत असे. सातवीनंतर तिची शाळाही बंद केली. त्यामुळे १५ वर्षांची मुलगी मानसिकरीत्या खचली होती. निमुटपणे ती सगळा त्रास सोसत दिवस कंठित होती. २५ जानेवारी रोजी सावत्र पित्याने तिला लाकडाने मारहाण केली. यात तिच्या डोक्याला दुखापत झाली. आईचा धाक व वडिलांची मारहाण यामुळे अनवाणी पायाने ती घराबाहेर पडली अन् वणवण भटकत शिवाजीनगर ठाण्यात पोहोचली. सकाळी आठ वाजेपासून ठाण्याच्या आवारातील बाकड्यावर ती बसलेली होती. सव्वानऊ वाजता पोलीस निरीक्षक केतन राठोड ठाण्यात पोहोचले, तेव्हा त्यांची नजर तिच्यावर गेली. यावर त्यांनी तिला जवळ जाऊन विचारले तेव्हा ती ओक्साबोक्सी रडू लागली. तिला धीर देत त्यांनी चौकशी केल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. तिच्या तक्रारीवरून सावत्र पित्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 

Web Title: Mother-in-law's terror, step-father's harassment ... Khaki gives 'affection' to 15-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.