माजलगावात ‘जगताप-चाऊस’ वाद विकोपाला; राष्ट्रवादीत उभी फूट, ‘आधे इधर, आधे उधर’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:51 IST2026-01-30T18:45:33+5:302026-01-30T19:51:40+5:30
चाऊस गटाने स्वतंत्र गट स्थापन करून गटनेत्याची नोंदणी केल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

माजलगावात ‘जगताप-चाऊस’ वाद विकोपाला; राष्ट्रवादीत उभी फूट, ‘आधे इधर, आधे उधर’!
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव : येथील नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटत नाही, तोच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) मोठी फूट पडली आहे. मोहन जगताप आणि सहाल चाऊस यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला असून, १० नगरसेवकांच्या या गटात ‘आधे इधर, आधे उधर’ अशी अवस्था झाली आहे. चाऊस गटाने स्वतंत्र गट स्थापन करून गटनेत्याची नोंदणी केल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
नगरपालिकेत राष्ट्रवादीचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. सुरुवातीला इम्रान आगा खान यांची गटनेते म्हणून निवड झाली होती. मात्र, उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून ठिणगी पडली. मोहन जगताप यांचे समर्थक शरद यादव यांना सहाल चाऊस यांनी विरोध केला आणि थेट आमदार प्रकाश सोळंके (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करून उपाध्यक्षपद स्वतःच्या पदरात पाडून घेतले. तेव्हापासून जगताप आणि चाऊस यांच्यात विस्तवही जात नव्हता.
विषय समिती निवडीत पेच
दोन दिवसांपूर्वी विषय समितीची निवड प्रक्रिया होणार होती. मात्र, गटनेत्यासह जगताप गटाच्या चार नगरसेवकांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. परिणामी, ही निवडप्रक्रिया पुढे ढकलावी लागली. गटनेता आपल्या बाजूने नसल्यास अडचण येऊ शकते, हे ओळखून सहाल चाऊस यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.
नव्या गटाची नोंदणी
सहाल चाऊस यांनी अपक्षांना सोबत घेऊन नऊजणांचा नवीन गट तयार केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी लतिफ सय्यद हुर यांची निवड करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. या गटाला अधिकृत मान्यता मिळते की नाही, यावर आता नगरपालिकेचे भवितव्य अवलंबून आहे.
शहराच्या विकासाचा बळी?
स्वतःच्याच पक्षातील नगरसेवकांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना विरोध होणार असल्याने, नगरपालिकेत पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. यापूर्वीही माजलगावात नगरसेवकांच्या अंतर्गत वादात शहराचा विकास खुंटला होता, आता पुन्हा तीच पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.