Video: बीड पालिकेत मनसेचा राडा; रस्त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीनमध्ये तोडफोड
By सोमनाथ खताळ | Updated: August 11, 2023 15:13 IST2023-08-11T15:11:17+5:302023-08-11T15:13:38+5:30
घटनेनंतर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत आपल्या विभागांना कुलूप लावले.

Video: बीड पालिकेत मनसेचा राडा; रस्त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीनमध्ये तोडफोड
बीड : शहरातील मोंढा नाका ते अमरधाम स्मशानभूमि या दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता करावा म्हणून चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने खड्डयांभोवती रांगोळी काढत आंदोलन केले होते. परंतू याची कसलीच दखल मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी न घेतल्याने मनसेचे पदाधिकारी संतापले. शुक्रवारी सकाळी अचानक पालिकेत येत त्यांनी काचांची तोडफोड केली. त्यानंतर मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या केबीनमध्ये जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली.
या प्रकारानंतर पालिकेतील कर्मचारी सीओंच्या केबीनमध्ये धावले. त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना पकडून कॅबीनच्या बाहेर काढले. हा प्रकार समजताच बीड शहर ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. दुपारपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. बीड शहरात सध्या स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते या मुलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिक आक्रमक होत आहेत. मुख्याधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बीडकरांना बसत असून त्यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे.
बीड: नगरपालिकेत मनसेचा राडा; रस्त्याच्या मागणीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीनमध्ये कार्यकर्त्यांची तोडफोड. pic.twitter.com/x6F78D4Jvp
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 11, 2023
दरम्यान, घटनेनंतर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत आपल्या विभागांना कुलूप लावले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.