"मित्राने गुन्हा केला तर नेत्याचा दोष नसतो"; दत्तात्रय भरणेंनी धनंजय मुडेंवर दाखवला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:23 IST2025-01-01T12:37:54+5:302025-01-01T13:23:43+5:30
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडेंचा या सगळ्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा, असं म्हटलं आहे.

"मित्राने गुन्हा केला तर नेत्याचा दोष नसतो"; दत्तात्रय भरणेंनी धनंजय मुडेंवर दाखवला विश्वास
Walmik Karad: राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार उल्लेख झालेल्या वाल्मीक कराडने मंगळवारी सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. वाल्मिक कराडचे बीडच्या राजकारणातील मोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो व्हायरल झाल्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले जात आहे. या प्रकरणाचा तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंकडून मंत्रीपद काढून घेण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. वाल्मीक कराडच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, वाल्मीक कराडचे मंत्री धनंजय मुंडेंसोबत असलेल्या संबंधावरुन त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करत त्यांचा या प्रकरणात संबंध नसल्याचे म्हटलं आहे.
"आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रकरणाचा तपास सुरु आहे. काल वाल्मीक कराड शरण आलेले आहेत. जो दोषी असेल त्याच्यावर १०० टक्के कारवाई केली जाईल. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आमचे नेते आहेत. मित्र, कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. एखाद्या मित्राने किंवा कार्यकर्त्याने केले तर वरच्या नेत्याचा दोष असतो असं नाही. तपासामधून सगळं समोर येणार आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे यांचा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा," असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दबावाला बळी पडू नये - प्रकाश आंबेडकर
"पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे लपलेला आहे हे माहिती नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. तपास यंत्रणांनी आपले अपयश वारंवार लोकांसमोर आणू नये. सरकामध्ये यासंदर्भात दबाव आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी एवढीच त्यांना विनंती आहे. मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये एवढीच माझी विनंती आहे," असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.