'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:00 IST2025-12-12T15:53:33+5:302025-12-12T16:00:14+5:30
शेवटच्या श्वासापर्यंत येत राहू! भावनिक वातावरणात मुंडेप्रेमींनी घेतले समाधीचे दर्शन.

'अमर रहे' घोषणांनी गोपीनाथ गड दुमदुमला! लोकनेते मुंडेंच्या जयंतीनिमित्त जनसागर उसळला
- संजय खाकरे
परळी (बीड): महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (१२ डिसेंबर) परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गड 'अमर रहे... अमर रहे... गोपीनाथराव मुंडे अमर रहे...' या घोषणांनी दुमदुमून गेला. राज्यभरातून हजारो चाहते सकाळपासूनच गोपीनाथ गडावर दाखल झाले आणि आपल्या लाडक्या नेत्याच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत त्यांनी विनम्र अभिवादन केले. संपूर्ण परिसर मुंडेसाहेबांच्या स्मृतीने भारलेला होता.
गडावर मुंडे कुटुंबाची उपस्थिती
यावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी कृषिमंत्री व परळीचे आमदार धनंजय मुंडे, बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे आणि प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी एकत्र येत समाधीस्थळाचे दर्शन घेतले आणि भजन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार यांसह अनेक मान्यवर आणि मुंडेप्रेमींची गर्दी होती.
पंकजा मुंडेंची भावनिक साद
भजन कार्यक्रमानंतर उपस्थित मुंडेप्रेमींसमोर बोलताना मंत्री पंकजा मुंडे अत्यंत भावुक झाल्या. "लोकनेते गोपीनाथराव मुंडेंवर प्रेम करणाऱ्या जनतेला नतमस्तक होण्यासाठी स्थळाची गरज होती, म्हणून गोपीनाथ गड उभा राहिला. ही निर्मिती माझी नसून जनतेच्या प्रेमाची आहे." त्यांनी पुढे वचन दिले, "आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही गोपीनाथगडावर येत राहू." गोपीनाथरावांनी वंचितांसाठी आयुष्य घालवले, त्यांनी उभं केलेलं कार्य अधिक सुदृढ करण्यासाठी ईश्वर आम्हाला बळ देवो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शिखरशिंगणापूरची 'संघर्ष ज्योत' दाखल
गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. राजेंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १२ वर्षे अखंडितपणे काढण्यात येणारी शिखरशिंगणापूर ते परळी वैजनाथ संघर्ष ज्योत सकाळी साडेअकराच्या सुमारास गोपीनाथ गडावर पोहोचली. महादेवाला अभिषेक करून प्रस्थान केलेली ही ज्योत घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी स्वागत केले. दिवसभर गडावर रक्तदान शिबिर आणि प्रसादाचा कार्यक्रम सुरू होता.