४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह, पुण्याला जाण्यावरून वादावादी; नवदाम्पत्याने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 09:07 IST2025-04-04T09:07:18+5:302025-04-04T09:07:53+5:30
Beed Crime News: ४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह झाला; परंतु गावाकडून पुण्याला राहायला जाण्यावरून दोघांत वाद झाला. यात पत्नीने राहत्या घरात तर पतीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह, पुण्याला जाण्यावरून वादावादी; नवदाम्पत्याने संपवलं जीवन
बीड - ४० दिवसांपूर्वीच धूमधडाक्यात विवाह झाला; परंतु गावाकडून पुण्याला राहायला जाण्यावरून दोघांत वाद झाला. यात पत्नीने राहत्या घरात तर पतीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी बीड तालुक्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) व पत्नी शुभांगी (२१) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
अक्षय हा पुण्यात लाइट फिटिंगचे काम करीत होता. लग्नासाठी त्याने सुटी घेतली होती. बुधवारी तो परत पुण्याला जात होता. यावेळी शुभांगीनेही पुण्याला राहायला जाण्याचा हट्ट धरला. अक्षयने समजावल्यानंतरही तिने ऐकले नाही. अक्षय बसमधून पुण्याला जाण्यासाठी गेला असता इकडे पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजल्यानंतर अक्षय परत आला. यावेळी त्याच्या सासरच्या लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला. याच तणावातून अक्षयनेही शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर केतुरा येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षयच्या नातेवाइकांनी त्याचे मृत्यूपश्चात नेत्रदान केले.