२ लाखांत लग्न, सासरी येताच ३ तासांतच नवरी पळाली; नातेवाइकांनी बसस्टँडवर पकडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:05 IST2025-12-09T17:58:06+5:302025-12-09T18:05:15+5:30
शौचास जाण्याच्या बहाण्याने पळून जाताना पकडली; नवऱ्या मुलाची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

२ लाखांत लग्न, सासरी येताच ३ तासांतच नवरी पळाली; नातेवाइकांनी बसस्टँडवर पकडली
- मधुकर सिरसट
केज (बीड): अंबाजोगाई तालुक्यातील एका तरुणाची लग्नाच्या नावाखाली तब्बल १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीपेवडगाव येथील हनुमान मंदिरात लग्न लावलेली नवरीबाई, कोद्री येथे सासरी आल्यानंतर अवघ्या तीन तासांतच पळून जाण्याचा प्रयत्न करताना ग्रामस्थांनी पकडल्यामुळे या बनावट लग्नाच्या खेळाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी नवरीसह चार आरोपींविरुद्ध युसूफवडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ लाखांत लग्न ठरले, मंदिरात बांधली गाठ
अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथील नागेश देविदास जगताप (वय ३६) या तरुणाचे लग्न लावून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या प्रल्हाद गुळभीले या एजंटाने मध्यस्थी केली होती. एजंट प्रल्हाद गुळभीले याने नागेश जगताप यांच्याकडून १ लाख ९० हजार रुपये घेतले. ६ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता दीपेवडगाव येथील हनुमान मंदिरात नागेश जगताप आणि प्रीती शिवाजी राऊत यांचा विवाह लावण्यात आला.
सासरला पोहोचताच फरार होण्याचा डाव
लग्न पार पडल्यानंतर वधू-वरासह सर्व नातेवाईक कोद्री येथे नागेश यांच्या घरी आले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास, म्हणजेच लग्नानंतर अवघ्या तीन तासांतच, नववधू प्रीती राऊत हिने शौचाला जाण्याच्या बहाण्याने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गावातील एका नागरिकाला ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने नागेश जगताप आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता, प्रीती राऊत ही डिघोळअंबा बस स्थानकाजवळ मिळून आली.
चार जणांविरोधात गुन्हा दाखल
पळून जाण्याचं कारण विचारल्यावर प्रीती राऊतने साथीदारांसोबत मिळून फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर नागेश जगताप यांच्या फिर्यादीवरून एजंट प्रल्हाद गुळभीले, नवरी प्रीती शिवाजी राऊत, तिची मावशी सविता (रा. पुणे) आणि माया राऊत (रा. चाकण, पुणे) या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नोटरीसह अनेकजण चौकशीच्या फेऱ्यात
पोलिसांनी नववधू प्रीती राऊत हिला अटक करून केज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला १० डिसेंबरपर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात केवळ नवरी आणि एजंटच नव्हे, तर लग्नाआधीच पतिकडील नावाचे बनावट आधारकार्ड तयार करणारे संगणक तंत्रज्ञ आणि केज येथील नोटरी करून देणारे व्यक्तीही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.