मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नारायणगडावर ९०० एकरात घेणार सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 12:52 IST2024-04-06T12:49:10+5:302024-04-06T12:52:16+5:30
गावागावात जाऊन बैठका घेण्यासाठी २० जणांची टीम तयार करा- मनोज जरांगे

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नारायणगडावर ९०० एकरात घेणार सभा
बीड :मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. याच अनुषंगाने ८ जून २०२४ रोजी बीड तालुक्यातील नारायणगडावर ९०० एकरात ऐतिहासिक सभा घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. जरांगे यांनीच बैठकीत याची घोषणा केली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारला आहे. सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले, परंतु यावर समाधानी नसल्याने जरांगे आजही लढा देत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाची बैठक घेतली. लोकसभा निवडणूक अनुषंगाने भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर त्यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी सभा घेण्याची घोषणा केली होती.
त्याप्रमाणे आता ही सभा ८ जून २०२४ रोजी बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर होणार आहे. शुक्रवारी नारायणगडावरील बैठकीत जरांगे यांनी याची घाेषणा केली. तसेच आता गावागावात जाऊन बैठका घेण्यासाठी २० जणांची टीम तयार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. ही सभा ९०० एकरात होणार असून राज्यातील मराठा समाज बांधव यात सहभागी होणार असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.