Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 17:03 IST2025-08-03T17:02:13+5:302025-08-03T17:03:09+5:30
Manoj Jarange Latet news: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे बीडमध्ये असताना त्यांच्या लिफ्टचा अपघात झाला. कार्यकर्त्यांसह ते वरच्या मजल्यावर जात असताना लिफ्ट खाली कोसळली.

Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे कार्यकर्त्यांसोबत असताना एका दुर्घटनेतून थोडक्यात वाचले. मनोज जरांगे हे सध्या भेटीगाठी घेत असून, बीडमध्ये एका रुग्णालयात भेटीसाठी निघाले होते. कार्यकर्त्यांसह लिफ्टने पहिल्या मजल्यावर जात असताना त्यांची लिफ्ट खाली कोसळली.
मनोज जरांगे यांनी पुन्हा मुंबईमध्ये येऊन मोर्चा करण्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, रविवारी (३ ऑगस्ट) बीडमध्ये असताना ते एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले.
कार्यकर्त्यांसह लिफ्टमध्ये बसले अन्...
मनोज जरांगे हे बीडमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीच्या भेटीसाठी निघाले होते. शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर रुग्णालयात ते आले. कार्यकर्त्यांसह लिफ्टमध्ये बसले. पहिल्या मजल्यावर ते निघाले होते.
लिफ्ट पहिल्या मजल्यावर असताना खाली कोसळली. या घटनेने लिफ्टमधील सगळेच घाबरले. त्यानंतर जरांगे आणि इतर कार्यकर्त्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर जरांगे यांनी जिन्यावरून जाऊन उपचार घेत असलेल्या व्यक्तीची भेट घेतली.
२९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी मार्च काढत मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे हे २७ ऑगस्टला बीडवरून निघणार आहेत आणि मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू करणार आहे.
२७ ऑगस्टला मार्च अंतरवालीवरून निघणार आहे. पैठण शेवगाव, अहिल्यानगर, आळेफाटा, जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन नंतर माळशेज घाटातून कल्याण, चेंबूर मार्गे हा मार्च मुंबईला पोहोचणार आहे.
याच आंदोलनासंदर्भात मनोज जरांगे वेगळ्या जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुणे जिल्ह्यात बैठका घेतल्या. इतर जिल्ह्यातही ते मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.