"भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार"; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:41 IST2024-07-08T16:29:06+5:302024-07-08T16:41:04+5:30
''धनंजय मुंडेंच्या विरोधात 'मविआ'ने मला तिकीट द्यावे''; रासपच्या माजी युवा प्रदेशाध्यक्षाने परळीत केली मागणी

"भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार"; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान
परळी (बीड) : गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत गेल्या १३ वर्षापासून काम करीत असलेले रासपाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून आव्हान दिले आहे. तशी घोषणा फड यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. आपण कसल्याची प्रकारे माघार घेणार नसल्याचेही फड यांनी जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव मुंडे बहीण-भावाच्या जिव्हारी लागला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. यामुळे परळी विधानसभेतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे लढणार हे स्पष्ट आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात मुंडे बहीण भाऊ लढले. मात्र, यावेळी पंकज मुंडे विधानसभा लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आणि रासपचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी फड यांनी आगामी परळी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती दिली आहे. फड पुढे म्हणाले, बारामतीच्या धर्तीवर परळीचा विकास आणि भयमुक्त परळी करण्यासाठी नागरिकांच्या इच्छे खातर आपण परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहोत. महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असल्याचे सरपंच राजेभाऊ फड यांनी सांगितले.
महाविकास आघाडीला तिकीट मागणार
तसेच याबाबत आपण महाविकास आघाडीचे सर्व नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मागणार आहोत. परळी मतदार संघाची परिस्थिती, लोकांच्या भावना आपण त्यांना सांगणार आहोत. आपण या निवडणुकीत उभा टाकण्यावर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही किंवा कोणाच्याही दबावाला भिणार नाही असा निर्धारही राजेभाऊ फड यांनी यावेळी व्यक्त केला.