‘महाराष्ट्राची सत्ता सामान्य मराठ्यांची नसून १६९ घराण्यांच्या हातात आहे’-प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:07 IST2019-01-13T00:06:52+5:302019-01-13T00:07:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गेली अनेक वर्षे झाले महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात आहे, मात्र ही सत्ता ...

‘महाराष्ट्राची सत्ता सामान्य मराठ्यांची नसून १६९ घराण्यांच्या हातात आहे’-प्रकाश आंबेडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेली अनेक वर्षे झाले महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात आहे, मात्र ही सत्ता सामान्य मराठा समाजाची नसून फक्त १६९ घराण्यांच्या हातात आहे. हे मंत्री, आमदार, खासदार, पाहिले तर सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ही घराणेशाही मोडीत काडण्याची गरज असल्याचे सांगून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली.
शनिवारी बीड येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या ‘सत्ता संवाद निर्धार’ या जाहीर सभेत अॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, माजी.आ. हरीभाऊ भदे, बबन वडमारे, शेख निजाम, सचिन माळी, किसन चव्हाण, मुफ्ती कामेद, डॉ. इंदरकुमार भिसे, विष्णू देवकते, अमीत भुइंगळ, गंगाभीषण थावरे, सुशीला मोराळे, शीतल साठे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, भाजपच्या हातात दुसऱ्या वेळी सत्ता दिली मात्र त्यांना सरकार चालवता येत नाही. विकासाच्या नावाखाली भांडवलदारांना जोपासण्याचे या सरकारचे धोरण आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यांचे प्रश्न सोडवायला सरकारकडे पैसा नाही. भाजपप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेही दगलबाज आहेत. नोटाबंदीमुळे लाखो तरुण बेरोजगार झाले. मात्र, ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी बँकामधून भाजप दलालांच्या माध्यमातून ४० टक्के प्रमाणे रक्कम देऊन हा पैसा पांढरा केला आहे. हाच पैसा मतदारांना खरेदी करण्यासाठी वापरला जातोय, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू जाधव यांनी केले. नदीपात्रात घेतलेल्या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
क्षीरसागरांची भांडणं फक्त लोकांना दाखवण्यासाठी
संदीप क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांच्यातील भांडणं ही लोकांना दाखवण्यासाठी आहेत. तसेच इतर पर्याय उपलब्ध होऊ नये यासाठी ही नाटकं केली जात आहेत, सत्तेसाठी क्षीरसागर काहीही करु शकतात अशी टीका एएमआयएमचे जिल्हाअध्यक्ष शेख निजाम यांनी केली.