Vidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:36 AM2019-09-19T04:36:06+5:302019-09-19T04:36:38+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - Attempts to set a shattered 'clock' | Vidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न

Vidhan Sabha 2019 : विस्कटलेली ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न

Next

सतीश जोशी 
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्ह्यातील विस्कटलेली ‘घडी’ पूर्ववत करण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. जिल्ह्यातील सहापैकी बीड, माजलगाव, परळी, केज आणि गेवराई या पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित करून त्यांना कामाला लावले. आष्टीमध्ये त्यांना एकही उमेदवार जाहीर करण्यासारखा मिळाला नाही.
शरद पवारांना साथ देणारा जिल्हा म्हणून तशी बीड जिल्ह्याची ओळख. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी स्थापन केलेल्या काँग्रेस (एस) ला १९८० च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भरभरून यश मिळाले. सातपैकी बीड, माजलगाव, गेवराई, चौसाळा आणि केजमध्ये पवारांच्या पक्षाने बाजी मारली. आष्टीमध्ये अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे तर रेणापूर मतदारसंघात भाजपाचे गोपीनाथ मुंडे विजयी झाले होते. काँग्रेससारख्या प्रस्थापित पक्षाविरुद्ध या जिल्ह्यातील जनतेने विरोधी पक्षाला जवळ केले होते. यानंतर जिल्ह्यात पवारांना मानणारा मतदार तयार झाला होता. येथील राजकीय घराण्यात उफाळून आलेल्या भाऊबंदकीचे खापर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बारामतीच्या काका-पुतण्यांच्या नावाने फुटू लागले आणि पवारांच्या राष्टÑवादी काँग्रेस पिछेहाट होत राहिली. एकीकडे मुंडे, पंडित आणि क्षीरसागर घराण्यात राजकीय संघर्षातून अंतर्गत कलह चालू असताना पवारांनी त्याकडे डोळेझाक केली. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे, प्रकाश सोळके या मातब्बर नेत्यांमध्ये जिल्हा नेतृत्वासाठी संघर्ष चालू असताना तो मिटविण्याचा प्रयत्न पवारांकडून झाला नाही. ही सर्व मंडळी पवारांच्या शब्दाबाहेरची नव्हती. जिल्ह्यातील या नेतेमंडळीत तीन वर्षांपासून हा संघर्ष चालू होता. या काळात पवार काका-पुतणे अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात येऊन गेली. पक्षांतर्गत गटबाजी होती, परंतु, टोकाची नव्हती. ती मिटण्यासारखी होती. दोन वर्षे पक्षीय कार्यक्रमापासून कोसो दूर असलेले जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांच्या बीडच्या कार्यक्रमास उपस्थित
राहिलेच नाहीत तर झाले गेले विसरून त्यांनी या कार्यक्रमाची सारी सुत्रेही स्वत:कडे घेतली होती. क्षीरसागर, पंडित, मुंडे आणि सोळंके एका व्यासपीठावर आल्याचे पाहून वाद मिटला असे जिल्ह्याला वाटले होते. शरद पवार जिल्ह्याच्या वेसीबाहेर पडत नाही तोच या नेतेमंडळीनीही एकमेकांकडे पाठ फिरवली. जिल्हा नेतृत्वपदाच्या या मंडळीच्या हव्यासात बीड जिल्हा शरद पवारांच्या हातातून निसटला.
>पंकजा मुंडे यांनी
बाजी मारली
राज्याचे नेतृत्व करणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या स्वत:च्याच जिल्ह्यात स्थानिक स्वराज संस्था निवडणूक, लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. गटबाजीतून आ. सुरेश धस यांना पक्षाने निलंबित केले तर आ.जयदत्त क्षीरसागर यांनी राष्टÑवादीला जय महाराष्टÑ केला. पंकजा मुंडे यांनी या संधीचा फायदा उचलत धस आणि क्षीरसागरांच्या मदतीने राष्टÑवादी काँग्रेस खिळखिळी केली.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - Attempts to set a shattered 'clock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.