Maharashtra Bandh : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:30 IST2018-08-09T17:27:50+5:302018-08-09T17:30:39+5:30

Maharashtra Bandh : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आत्महत्या
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथित झालेल्या एका ४५ वर्षीय इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा येथे बुधवारी रात्री घडली. प्रशासनाकडून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला शासकीय नौकरी देण्याचे लेखी पत्र संबंधित कुटुंबाला दिले आहे.
एकनाथ सुखदेव पैठणे (रा. कांबी मजरा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पैठणे यांचा आरक्षणासंदर्भातच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग होता. बुधवारी सकाळी सिरसदेवी येथून काढलेल्या रॅलीतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी विष प्राशन केले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
दरम्यान, एकनाथ पैठणे यांचा मुलगा कृष्णा याच्या जवाबावरुन ही आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान व कुटुंबातील सदस्याला तातडीने नौकरीवर घेण्याचे लेखी पत्र दिले.
जिल्ह्यात पाचवी आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत पाच जणांनी जीवनयात्रा संपविली आहे. बीड तालुक्यात २, पाटोदा व केज तालुक्यात प्रत्येकी एक अशा चार आत्महत्या यापूर्वी झालेल्या आहेत. आतापर्यंत पाच आत्महत्यांची नोंद शासन दरबारी झाली आहे.