महादेव मुंडे खूनप्रकरण; पोलिसांना एक महिन्यांचा अवधी देत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचे उपोषण मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:42 IST2025-03-04T19:42:23+5:302025-03-04T19:42:41+5:30

परळी येथील बँक कॉलनीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणास १६ महिने उलटले असताना हे मारेकरी मोकाटच आहेत.

Mahadev Munde murder case; Wife Dnyaneshwari Munde's hunger strike called off after giving a month's time to Police | महादेव मुंडे खूनप्रकरण; पोलिसांना एक महिन्यांचा अवधी देत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचे उपोषण मागे

महादेव मुंडे खूनप्रकरण; पोलिसांना एक महिन्यांचा अवधी देत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचे उपोषण मागे

बीड : परळीतील महादेव मुंडे यांचा खून होऊन दीड वर्ष उलटले तरी आरोपीस अटक नाही, प्रशासनाने आमची दिशाभूल केली आहे. जोपर्यंत महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. एकतर एसआयटी स्थापन होईल किंवा माझी माझी बॉडीच येथून जाईल, अशी कठोर भूमिका ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. सायंकाळी पोलिसांनी त्यांची भेट घेत पुन्हा महिन्याचा अवधी मागितला. त्यानंतर मुंडे यांनी उपोषण मागे घेतले.

परळी येथील बँक कॉलनीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणास १६ महिने उलटले असताना हे मारेकरी मोकाटच आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे परिवाराच्या वतीने सोमवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, माझ्या पतीच्या खूनप्रकरणी आज-उद्या कारवाई होईल, आरोपी पकडले जातील असे वाटत होते; परंतु दीड वर्ष झाले तरी एकही आरोपी अटक नाही. आणखी किती दिवस वाट पाहायची आम्ही? प्रशासनाने आमची दिशाभूल केली आहे. पोलिसांनी ज्यांच्याकडे तपास दिला आहे ते अनिल चोरमले नामक अधिकारी १० दिवसांपासून रजेवर आहेत. मग आम्हाला तपास कोण सांगणार? असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मृत महादेव मुंडे यांचे वडील दत्तात्रय मुंडे, गोविंदराव फड, भगवान फड, सतीश फड, तुळसाबाई फड, छाया फड यांच्यासह कन्हेरवाडी, भोपळा येथील नातेवाईक बीड येथील आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारनंतर अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेत तपासासाठी आणखी महिनाभराचा वेळ मागत पुन्हा तारीख दिली. या आगोदरही तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक तारखा दिल्या होत्या. अखेर सोमवारी सायंकाळच्या सुमारास हे उपोषण मागे घेतले.

आरोपीच निष्पन्न नाहीत
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वारंवार पोलिसांना अल्टिमेटम दिला; परंतु अद्यापही बीड पोलिसांना आरोपी निष्पन्न करण्यात यश आलेले नाही. आतापर्यंत मुंडे यांना केवळ आश्वासने देण्यात आली; परंतु पोलिसांच्या याच आश्वासनांना वैतागून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुले, कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांना आश्वासन देत महिन्याचा वेळ मागितला आहे.

Web Title: Mahadev Munde murder case; Wife Dnyaneshwari Munde's hunger strike called off after giving a month's time to Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.