महादेव मुंडे खून प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंचे कुटुंब, नातेवाईकांसह उपोषण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:30 IST2025-03-03T12:28:06+5:302025-03-03T12:30:42+5:30
१६ महिन्यांनंतरही आरोपींना अटक नाही; ज्ञानेश्वरी मुंडे, मुंडे कुटुंब आणि कन्हेरवाडी, भोपळा येथील नातेवाईक उपोषणात सहभागी

महादेव मुंडे खून प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंचे कुटुंब, नातेवाईकांसह उपोषण सुरू
- संजय खाकरे
बीड/ परळी: परळी येथील बँक कॉलनीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणास 16 महिने उलटले असताना ही मारेकरी मोकाटच आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे परिवाराच्या वतीने आजपासून ( दि.३ ) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
महादेव मुंडे यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करून त्यांचा मृतदेह परळीच्या तहसील कार्यालयासमोरील जागेत 22 ऑक्टोबर 2023 रोजी आढळून आला. याप्रकरणी 22 ऑक्टोबर रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अद्यापही एका आरोपीसही अटक करण्यात आलेले नाही. 16 महिन्यानंतरही आरोपी अटक नसल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आष्टीचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली व मुंडे कुटुंबाचे सांत्वन केले.
१६ महिन्यांनंतरही आरोपींना अटक नाही, कुटुंबासह उपोषण
दरम्यान, न्यायासाठी गेल्या काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वर मुंडे या उपोषण करणार होत्या परंतु त्यांना विनंती करण्यात आल्याने त्यांनी उपोषण लांबणीवर टाकले होते. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक न केल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तीन मार्चपासून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळपासून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडे यांचे वडील दत्तात्रय मुंडे, तसेच गोविंदराव फड, भगवान फड सतीश फड, तुळसाबाई फड, छाया फड यांच्यासह कन्हेरवाडी, भोपळा येथील नातेवाईक सहभागी झाले आहेत.