Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'पॉवरफुल राजकारणी' धनंजय मुंडेंचा परळीत नागरी सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 15:25 IST2018-04-21T15:25:27+5:302018-04-21T15:25:27+5:30
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये नागरी सत्कार करण्यात आला.

Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'पॉवरफुल राजकारणी' धनंजय मुंडेंचा परळीत नागरी सत्कार
परळी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. ''22 वर्षांच्या राजकारणात अनेक चढ उतार आले, जय पराजय पाहिले. मात्र इतका अभुतपूर्व आणि नागरी सत्कार होण्याची आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. परळीकरांच्या या प्रेमाला मी कदापीही विसरणार नाही. कोणतेही पद मिळाले तरी उतणार नाही, मातणार नाही जनसेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही. राज्यात परिवर्तन घडविण्याची ताकद इथल्या मातीत आणि माणसात आहे. ते मी करून दाखवतो तुम्ही फक्त त्यासाठी साथ आणि आशीर्वाद द्या'' अशी भावनिक साद यावेळी धनंजय मुंडे यांनी घातली.
'लोकमत' वृत्तपत्राने धनंजय मुंडे यांचा नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८ पॉवरफुल राजकारणी अर्थात प्रभावशाली नेता हा पुरस्कार देवुन गौरव केल्याबद्दल परळी शहरात त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेत्या माजी खासदार रजनीताई पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतिष चव्हाण, आमदार मधुसुदन केंद्रे, यांच्यासह बीड जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
नागरी सत्कार समितीच्या वतीने भव्य सत्कार, मानपत्र देऊन मुंडेंना गौरवण्यात आले. यावेळी मुंडे भावुक झाले होते. ''आज हा सोहळा पाहण्यास स्वर्गीय अण्णा, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर त्यांची छाती अभिमानाने फुलुन गेली असती. वा रे पठ्या म्हणून त्यांनी ही पाठ थोपटली असती'', हे सांगताना ते गहिवरून आले होते.