लोकमत इम्पॅक्ट: नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा! बंदुकीचे १०० परवाने रद्द; बीड जिल्ह्यातील प्रकार

By सोमनाथ खताळ | Updated: January 8, 2025 12:29 IST2025-01-08T12:26:27+5:302025-01-08T12:29:20+5:30

पहिल्यांदाच पोलिस प्रशासनाकडून एवढी मोठी कारवाई

Lokmat Impact 100 gun licenses with criminal records cancelled Beed district case | लोकमत इम्पॅक्ट: नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा! बंदुकीचे १०० परवाने रद्द; बीड जिल्ह्यातील प्रकार

लोकमत इम्पॅक्ट: नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा! बंदुकीचे १०० परवाने रद्द; बीड जिल्ह्यातील प्रकार

सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : तब्बल १६ गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगाराच्या कंबरेलाही परवानाधारक बंदूक होती. हाच प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर पोलिसांनी पत्र पाठविले. यामध्ये मंगळवारी तब्बल १०० परवाने निलंबित आणि रद्द करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाली आहे.

जिल्ह्यात एक हजार २८१ जणांकडे शस्त्र परवाना आहे. परवाना देताना पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली जाते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची माहिती घेतली जाते. परंतु, मागील काही वर्षांत पोलिसांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळेच राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासनाच्या संगनमताने अगदी चणे-फुटाणे याप्रमाणे परवाने देण्यात आले. तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या सर्वांची यादी बनवली.

परळीत हवेत गोळीबार...

परळीत कैलास बाबासाहेब फड, माणिक मुंडे आणि जयप्रकाश सोनवणे यांनी हवेत गोळीबार केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या तिघांचाही परवाना आता रद्द झाला आहे.

२३२ जणांना नोटीस

गुन्हे दाखल असलेल्या २४५ व्यक्तींची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. छाननी केल्यावर २३२ जणांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावले. खुलासा असमाधानकारक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपर्यंत १०० प्रस्ताव रद्द केले आहेत.

अधिवेशनातही गाजला मुद्दा

  • ६ डिसेंबर २०२३ रोजी ‘लोकमत’ने सर्वांत अगोदर ‘चोरच झाले शिरजोर, गुन्हेगारांच्या कंबरेलाच परवानाधारक पिस्टल’ असे वृत्त प्रकाशित केले होते. 
  • त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपचे आष्टीचे आ. सुरेश धस यांनी शस्त्र परवान्याचा विषय उपस्थित केला.
  • सत्ताधारी, विरोधी आमदारांसह अंजली दमानिया यांनीही हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर परवाना रद्दच्या कारवाया सुरू झाल्या आहेत.


महत्त्वाची आकडेवारी

  • उर्वरित प्रस्तावांवरही कारवाई सुरूच आहे - १३२
  • एकूण शस्त्र परवाने - १,२८१ 
  • रद्दचे प्रस्ताव पाठविले - २४५ 
  • छाननीत वगळले - १३

 

गुन्हे दाखल असतानाही परवाना

  • १ गुन्हा असलेले    १५५
  • २ गुन्हे असलेले    ४० 
  • ३ गुन्हे असलेले     २० 
  • ४ गुन्हे असलेले     १७ 
  • ५ गुन्हे असलेले     ३
  • ६ गुन्हे असलेले     ५
  • ९ गुन्हे असलेला     १
  • १० गुन्हे असलेला     १
  • १२ गुन्हे असलेला     १
  • १४ गुन्हे असलेला     १
  • १६ गुन्हे असलेला     १

Web Title: Lokmat Impact 100 gun licenses with criminal records cancelled Beed district case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.